NSK26H32259
जळगाव : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स सादर केली.
शिरसोलीच्या विज्ञान प्रदर्शन ३१ मॉडेल्स सादर
बारी समाज विद्यालयात आयोजन; विद्यार्थ्यांनी मांडल्या वैज्ञानिक संकल्पना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (ता. १३) शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती, संशोधनाची आवड आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, या उद्देशाने आयोजित प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्याध्यापक आर. एस. आंबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष ॲड. नीलेश खलसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रभारी पर्यवेक्षक एस. ए. भदाणे, ज्येष्ठ शिक्षक आर. के. पाटील, विज्ञान विभागप्रमुख डी. के. पाटील यांच्यासह विद्यालयातील विज्ञान शिक्षक उपस्थित होते.
प्रदर्शनात लहान गटातील विद्यार्थ्यांनी १२, तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी १९, अशी एकूण ३१ मॉडेल्स सादर केली. विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित या मॉडेल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता, प्रयोगशीलता आणि नावीन्यपूर्ण विचार मांडले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सची माहिती देत त्यामागील वैज्ञानिक तत्त्वेही समजावून सांगितली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे मत ॲड. खलसे यांनी व्यक्त केले. यशस्वितेसाठी विज्ञान विभागप्रमुख डी. के. पाटील आणि सर्व विज्ञान शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.