नशेसाठी पैसे न दिल्याने
व्यावसायिकावर शस्त्राने हल्ला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२३ : नशा करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तीन ते चार जणांनी भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) सकाळी साडेनऊच्या सुमारास खेडी गावाजवळ घडली. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
किशोर बाविस्कर हे भंगार विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २२) सायंकाळ काही व्यक्तींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, बाविस्कर यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून रात्री उशिराही त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी संशयितांनी बाविस्कर यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केल्याचे सांगण्यात येते. त्यांनी नकार दिल्यानंतर वाद वाढला आणि संशयितांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात बाविस्कर यांच्या कमरेवर, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.