Nashik News : द्राक्षविक्री अन मुलामुलीचे लग्न सारखेच! डॉ. शेखर यांचे शेतकऱ्यांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grapes

Nashik News : द्राक्षविक्री अन मुलामुलीचे लग्न सारखेच! डॉ. शेखर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

ओझर : आपल्या परिवारात मुलामुलीचे लग्न जुळवतांना आपण सर्व प्रकारच्या चौकशा बारकाईने करतो, त्याच धर्तीवर द्राक्षमालाची (Grapes) विक्री करताना व्यापाऱ्यांची ऐपत व कागदोपत्री पुरावे तयार करूनच व्यवहार केला पाहिजे.

गावागावात ग्रामसभेतून जनजागृती करुन शेतकऱ्यांनीच सजग रहायला हवे. (selling grapes transaction should be done only after ability of traders and preparation of documentary evidence nashik news)

व्यापाऱ्याने दिलेला धनादेश, पॅनकार्ड याची संबंधित बँकेत जाऊन पडताळणी केल्यास फसवणुकीला आळा बसेल. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी ओझर येथे केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे ओझर येथील द्राक्षभवनमध्ये शेतकरी वर्गाची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक या विषयावर झालेल्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, ओझरचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, नाशिक विभागाचे अध्यक्ष ॲड. रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख आदी उपस्थित होते.

प्रथमत: द्राक्ष उत्पादकांची विविध मार्गाने होणारी फसवणूक ही विश्वास संपादन करुन कशी होते, शेतकऱ्यांची व्यापारी वर्ग बाजारभावात तडजोड करायला भाग पाडतो, चेक देऊन पलायन करतो, दिलेले आधारकार्ड हे बनावट असते, यासारख्या मुद्यांवर उपाध्यक्ष भोसले यांनी प्रास्ताविकाद्वारे प्रबोधन केले.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

द्राक्ष बागायतदारांची व्यापारी वर्गाकडून होत असलेली फसवणूक तसेच गेल्या चार पाच वर्षापासून विविध भागतील व्यापाऱ्यांनी केलेली आर्थिक लुटीबाबत शेतकरी सतत पोलिस ठाणे व कोर्टात उभे राहून न्याय मागत आहे, यावर विविध शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस प्रशासनाने खाकीचा धाक दाखविला तर व्यापारी वर्गाकडून होणारी लुबाडणूक थांबेल असे मांडले.

नाशिकचे पोलिस अधीक्षक उमाप यांनी परप्रांतीय व्यापाऱ्यांची पडताळणी करण्याबाबत त्याचबरोबर व्यवहारात रोखठोकपणा बाळगला पाहिजे. व्यापाऱ्याची पत तपासली पाहिजे. केवळ वाढीव भाव देऊ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मनसुभे लक्षात आले पाहिजे या बाबी कटाक्षाने पाळाव्यात असे आवाहन केले. पोलिस अधिक्षक कार्यालयात किसान सेलचे कामकाज सुरु करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास कटिबध्द राहणार आहे. त्यासाठी पोलिस पाटलांना यापूर्वीच सूचना दिल्या असल्याचेही स्पष्ट केले.

नाशिक विभागीय संचालक ॲड. रामनाथ शिंदे यांनी चेक न वटल्यावर करावयाच्या कायदेशीर कारवाईची माहिती दिली. द्राक्षबागायतदार संघाचे संचालक बबनराव भालेराव, सुनील बाराहाते, नंदू पडोळ, बबलू मोरे, कैलास पाटील, दिनेश रकिबे, विलास गडाख, सोमनाथ माळोदे, विलास बोरस्ते, योगेश गडाख, शिवलाल ढोमसे, सागर कुशारे, अनिल‌ क्षीरसागर, माधव क्षीरसगार, भाऊसाहेब गवळी, संदीप ढिकले, सागर बोरस्ते, वैभव तासकर, मनोहर थेटे आदींसह नाशिक जिल्ह्यातील व तालुक्यातील असंख्य द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ॰ शेखर यांच्या सुचना

द्राक्षमालाचे व्यवहार सौदा पावतीनेच करा पोलिस कारवाईसाठी ते आवश्यकच

व्यापारासाठी आलेल्या व्यापार्यांचे छायाचित्रासह हंगामी व कायम निवासी पुरावा संबंधित पोलिस ठाण्यात ठेवण्याच्या सुचना

व्यापार्यासोबत काम करणारे पायलटची आधार कार्डसह नोंद रजिस्टर ठेवणार

पोलिस पाटील व ग्रामसेकांकडुन माहिती संकलित करावी

गावागावात ग्रामसभांद्वारे शेतकर्यांनी सौदा पावतीद्वारे शेतमाल व्यवहाराची चळवळ व्यापक करावी तो कायदेशीर कारवाईसाठी महत्वाचा पुरावा ठरेल

टॅग्स :NashikFarmerGrapes