धुळे : टुडे पान १ साठी....
--
सातासमुद्रापार पोहोचणार खमंग फराळ
-
धुळ्यातील टपाल विभागाचीही आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा सुरू
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : परदेशात शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या आपल्या प्रियजनांना दिवाळीत घरच्या फराळाची गोडी अनुभवता यावी यासाठी भारतीय टपाल विभागाने (इंडिया पोस्ट) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या नातलगांना घरचा खमंग फराळ आणि भेटवस्तू सुरक्षितपणे पाठवणे सुलभ झाले आहे.
फराळाचे पदार्थ योग्य प्रकारे आणि सुरक्षितपणे पोहोचवणे महत्त्वाचे असल्याने, टपाल कार्यालयातच नाममात्र दरात दर्जेदार पॅकेजिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अवघ्या काही मिनिटांत पॅकिंगचे काम पूर्ण करून हे पार्सल्स थेट परदेशात रवाना केले जातात. तसेच ''कस्टमर फर्स्ट'' दृष्टिकोनातून पिक-अप आणि पार्सलच्या सद्यःस्थितीची खात्री करण्यासाठी ऑनलाइन ‘ट्रॅक ॲन्ड ट्रेस’ची सुविधाही देण्यात आली आहे.
-
आवश्यक कागदपत्रे
परदेशात पार्सल पाठवताना केवायसीसाठी ओळखपत्र, वजनासह पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंची सविस्तर यादी, वस्तूंचे मूल्य आणि आठ डिजिट एचएस कोड देणे बंधनकारक आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे डाक विभागाचे प्रवर अधीक्षक एस. बी. ताठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.
-
१४-१
...चौकट...
१४-१
आप्तेष्टांना मिळणार घरचा स्वाद
गतवर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. धुळे, नंदुरबार, शहादा आणि शिरपूर भागातून पॅरिस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, जर्मनी, कॅनडा, इंग्लंड, रशिया, कुवेत, युएई, सौदी अरेबियासह १५ हून अधिक देशांत ३५ हून अधिक पार्सल्स सुरक्षितपणे पोहोचवली गेली. खासगी कुरिअरच्या तुलनेत टपाल खात्याची ही सेवा माफक दरात उपलब्ध असल्याने नागरिकांची आर्थिक बचत होणार असून, याद्वारे नागरिक ३५ किलो वजनापर्यंतचा फराळ व भेटवस्तू पाठवू शकतात.