ज्येष्ठांनी हक्कांसाठी कायद्याचा लाभ घ्यावा
ॲड. बी. व्ही. सोनवणे : विधी सेवा समितीतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ६ : मुलगा आई- वडिलांना खाऊ घालत नसेल तर खावटीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो. तसेच, फौजदारी कलम १२५ प्रमाणे खावटी मागता येते. कलम दहामध्ये खावटीच्या आदेशावर फेरफार करण्याचे अधिकार आहेत. मुलांच्या नावावर केलेली प्रॉपर्टी कलम २३ प्रमाणे मुलगा जर वागवत नसेल, तर परत मागता येते. ज्येष्ठांसाठीचा कायदा लहान आहे, पण तो फायद्याचा आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. बी. व्ही. सोनवणे यांनी केले.
येथील ज्येष्ठ नागरिक संघ व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने विश्व वृद्ध दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉ. एन. पी. पाटील होते. ॲड. हर्षल अहिरराव यांनी प्रास्ताविक केले.
ॲड. निलेश दिसले यांनी वृद्धांसाठी एकात्मिक कार्यक्रमांतर्गत वृद्धाश्रम डे, केअर युनिट, मोबाईल वैद्यकीय व्हॅन आदी सुविधा असल्याचे सांगितले. तसेच शासकीय योजनांवर ९० टक्के सबसिडी आहे. त्या ज्येष्ठांनी उपभोगल्या पाहिजेत, असे आवाहन केले. वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. बी. झेड. मराठे यांनी ज्येष्ठ हे संघर्षमय जीवन जगलेले असतात. आपले पूर्ण आयुष्य ज्यांच्यासाठी खर्च केले, ते दुर्लक्ष करत आहेत ही भावना त्यांच्यात निर्माण होते. त्यांच्याशी मुलांचा संवाद कमी झाला आहे. तो संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
या वेळी ज्येष्ठ नागरिक संघ वाचनालयाचे अध्यक्ष अशोक राखेचा, ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार गुलाबराव पाटील, सचिव चंद्रकांत डागा, संचालक बी. आर. पाटील, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वसंतराव पवार, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. शिरीश सोनवणे, ॲड. ए. एन. शेख, ॲड. पूजा कासार, ॲड. अनिता सोनवणे, ॲड. गीतांजली सोनवणे, ॲड. शारदा मराठे, शिंदखेडा न्यायालयीन कर्मचारी समीर शेख, एन. बी. पवार, योगेश बोरसे, डी. आर. जोशी, ग्रंथपाल सुभाष देसले आदी उपस्थित होते. ॲड. व्ही. एल. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सी. डी. डागा यांनी आभार मानले.
--------
ज्येष्ठांना पोटगी मागण्याचा अधिकार
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुलांकडून आई- वडिलांची देखभाल होत नसल्यास त्यांना कायद्याच्या माध्यमातून पोटगी मागण्याचा तसेच स्वतःच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या कायद्यांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले.