पासपोर्ट फोटो : 34521 (माधवी पाटील)
-------------
शहादा पालिकेच्या विकासकामांना मान्यता
उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांची माहिती
लोणखेडा, ता. ५ : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) सर्वसाधारण योजना २०२६-२७ अंतर्गत शहरात विविध विकासकामांसाठी एकूण पाच कोटी ३१ लाख ७७ हजार ३३ रुपये निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी यासंदर्भातील प्रशासकीय मान्यता दिली, अशी माहिती उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी दिली.
या योजनेंतर्गत शहादा शहरातील विविध रस्त्यांचे मजबुतीकरण, निर्माण कार्य आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाचा समावेश आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांत मान्यता मिळालेल्या प्रमुख कामांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्यासाठी ९२ लाख ५९ हजार ९९६ रुपये, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्यासाठी ९२ लाख ४३ हजार ५३१ रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते सिद्धार्थनगरपर्यंत रस्त्यासाठी ७१ लाख १२ हजार ३४९ रुपये, स्टेट बँक ते जुनी मोहिदा चौफुलीपर्यंत रस्त्यासाठी ८६ लाख १८ हजार ६७३ रुपये, सरवर मंडप ते आनंद बॅटरीपर्यंत रस्त्यासाठी ९४ लाख ६२ हजार ३९६ रुपये, भारत पेट्रोलपंप (जुनी एचडीएफसी बँक) ते नवा प्रकाश रोडपर्यंत रस्त्यासाठी ९४ लाख ८० हजार ८८ रुपये याप्रमाणे निधी मंजूर झाला. या सर्व कामांसाठी शासन हिस्सा ४५ लाख २० हजार ४७९ रुपये असून, पालिकेचा १५ टक्के हिस्सा सात लाख ९७ हजार ६५५ रुपये असणार आहे. संबंधित कामांची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानाच्या शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे पालिका मुख्याधिकाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. कामाची गुणवत्ता राखत ही विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. आमदार राजेश पाडवी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील विविध भागांत विकासकामांना मंजुरी मिळाल्याची माहिती उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी दिली.