: राजमोहन शर्मा यास दुसऱ्या गुन्ह्यात अटक

: राजमोहन शर्मा यास दुसऱ्या गुन्ह्यात अटक
Published on: 
वेतन अधीक्षक शर्मा दुसऱ्या गुन्ह्यात अटकेत २० पर्यंत पोलिस कोठडी; अन्य सहभागींचा शोध सुरू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१८ : बनावट शालार्थ आयडी तयार करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या माध्यमातून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याच्या कथित शालार्थ घोटाळ्याचा तपास पोलिसांनी अधिक व्यापक केला आहे. या प्रकरणातील संशयित वेतन अधीक्षक राजमोहन शर्मा याला दुसऱ्या गुन्ह्यातही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शालार्थ घोटाळ्याच्या तपासात बनावट आयडी तयार करणे, त्यांना मान्यता मिळवून देणे आणि त्याआधारे वेतनाची बिले मंजूर करण्याच्या प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार समोर येत आहेत. या प्रक्रियेत वेतन अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शर्माची भूमिका तपासली जात आहे. यापूर्वी एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात होता. आता पोलिसांनी त्याला याच गैरव्यवहाराशी संबंधित दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. शर्माच्या चौकशीतून बनावट शालार्थ आयडींची निर्मिती, वेतन मंजुरीसाठी झालेली प्रक्रिया, आर्थिक व्यवहार आणि त्यातील अन्य संबंधितांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला वेग येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शासनाच्या निधीचा कथित गैरवापर करण्यासाठी कोणत्या स्तरावर मदत करण्यात आली, तसेच अधिकारी, कर्मचारी आणि खासगी व्यक्तींचे नेमके काय संबंध होते, याचा पोलिस शोध घेत आहेत. चौकट वडगे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मालेगाव : शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे यांना जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने वडगे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचदरम्यान, बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यातील संशयित बडी मालेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक जाहिद हुसैन यांनाही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर य. ना. जाधव विद्यालयात चार कर्मचाऱ्यांची नियमबाह्य नियुक्ती करून त्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा वडगे यांच्यावर आरोप आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर पाटील यांनी मे २०२५ मध्ये छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली. त्यानुसार वडगे यांच्यासह तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन पोपटराव बच्छाव, निवृत्त मुख्याध्यापक हिरालाल सुकलाल वाघ, वरिष्ठ लिपिक नीलेश वडगे, सचिव जिभाऊ अहिरे, नितीन सूर्यवंशी, राजेंद्र निकम, विनायक खैरे आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दुसरीकडे, शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपासून फरार असलेले बडी मालेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक जाहिद हुसैन यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा कथित गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणातील तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आठ महिला शिक्षिकांसह अन्य १२ संशयित अद्याप फरार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.