शालार्थ आयडी घोटाळा (लोगो वापरणे)
---------------
गरुड बंधूंच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संजय गरुड याच्या जामीन अर्जावर सुनावणी बुधवार (ता. ७)पर्यंत ढकलण्यात आली आहे. शेंदुर्णी (ता. जामनेर) शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड हे बंधू सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
जामनेरच्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यास गेल्या २७ जुलैला सोलापूर जिल्ह्यातील फार्महाउसवरून नाशिक शहर गुन्हे शाखेने अटक करण्यात आली होती. तर याच संस्थेचा सहसचिव व संजय गरुडचा भाऊ दीपक गरुडलाही अटक करण्यात आली. सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. संजय गरुड याच्या जामिनावर युक्तिवाद होऊन त्यावरील सुनावणी बुधवारी (ता. ७) होणार आहे. तर, दीपक गरुड यानेही जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यावरही बुधवारीच (ता. ७) सुनावणी होणार आहे.
दरम्यान, शालार्थ आयडीप्रकरणी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासकामी दोन सहायक आयुक्त सचिन बारी व संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली पथके नेमली आहेत. या पथकांकडून उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमधील शाळांची झाडाझडती सुरू आहे. तर गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यासह काही अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळून लावले आहेत. यातील काही संशयित शिक्षणाधिकारी पसार असून, त्याचा शहर गुन्हे शाखेची पथके कसून शोध घेत आहेत.