NSK26H33363
जळगाव : जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या शानभाग विद्यालयाच्या संघातील खेळाडूंसमवेत मान्यवर.
––––
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत
शानभाग विद्यालयाला विजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानभाग विद्यालयाच्या १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. या कामगिरीच्या आधारावर शानभाग विद्यालयाचा संघ नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २२) सी. रा. चौधरी हायस्कूल किनोद (ता. जळगाव) येथे स्पर्धा पार पडल्या. या प्रतिष्ठेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील एकूण १५ नामांकित संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत शानभाग विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक ताळमेळ आणि जिद्दीचे प्रदर्शन घडवले. या विजयी संघात खिलेश माळी, अर्णव पाटील, रितेश भंगाळे आणि लोकेश महाजन, नचिकेत चौधरी आणि चिन्मय बर्हाटे या खेळाडूंनी मैदानावर उत्कृष्ट खेळ करत विद्यालयाला अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देत अजिंक्यपदावर मोहर उमटवली.
जिल्हास्तरीय स्पर्धेच्या विजेतेपदामुळे आता हा संघ उद्या (ता. २४) कळवण (जि. नाशिक) येथे होणाऱ्या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. संघाला विनोद वंडोळे यांच्यासह विद्यालयातील सर्व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल शालेय व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभागप्रमुख स्वप्नील पाटील, रुपाली पाटील, विद्यासामिती प्रमुख जगदीश चौधरी आदींनी कौतुक केले.
––––––––––––