लोगो : शालार्थ आयडी घोटाळा
मुख्याध्यापकांचे मोबाईल ‘स्विच ऑफ’!
एसआयटीची उत्तर महाराष्ट्रातील शाळांमध्ये चौकशी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : राज्यातील बहुचर्चित १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता उत्तर महाराष्ट्रातील शाळांपर्यंत पोहोचला आहे. विशेष तपास पथकांच्या (एसआयटी) चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची आणि अटकेची भीती असल्याने काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी मोबाईल फोन बंद केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शेंदुर्णी शिक्षण संस्थेतील गरुड बंधूंच्या जामीन अर्जावर सोमवारी (ता. १२) नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहायक आयुक्त सचिन बारी आणि संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष तपास पथके नियुक्त केली आहेत. या पथकांकडून नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील संशयित शैक्षणिक संस्थांच्या शाळांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणातील तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने तसेच मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. काही संशयित शिक्षणाधिकारी पसार असून, गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
शालार्थ प्रणालीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आयडी तयार करताना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या लॉगिनचा वापर झाल्याने एसआयटीने त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. संशयित आयडीशी संबंधित कागदपत्रे आणि ऑनलाइन व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. काही मुख्याध्यापकांनी चौकशीला सहकार्य केले असले, तरी पुरेशी माहिती दिलेली नसल्याचे समजते. शालार्थची कागदपत्रे संस्थाचालकांकडे असून, बेकायदेशीर व्यवहारांशी आपला संबंध नसल्याची भूमिका काही मुख्याध्यापकांनी घेतली आहे. त्यामुळे एसआयटीकडून संबंधित शाळांची कागदपत्रे संकलित करून त्यांची छाननी केली जात आहे. चौकशीसाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पोलिस आयुक्तालयात बोलावले जात आहे.