(टुडे पान ४ वर मेन)
फोटो : NSK26H34685 (माधवी पाटील)
------
पाच कोटींच्या निधीतून रस्त्यांचा कायापालट
उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांची माहिती; वाहतूक होणार सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
पुरूषोत्तमनगर, ता. ७ : शहादा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. या रस्त्यांची दुरूस्ती व पुनर्बांधणी करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळाले आणि रस्त्यांसाठी पाच कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर झाला. यातून शहराचा कायापालट होण्यास मदत आहे, अशी माहिती उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी दिली.
---------
माधवी पाटील म्हणाल्या, शहादा शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली होती. यामुळे नागरीकांना वाहन चालवितांना अडचणी होत्या. धुळीचाही मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. यामुळे उपनगराध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर शहरातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे ठरविले. यासाठी सर्व नगरसेवकांनी आमदार राजेश पाडवी यांना ही समस्या लक्षात आणून दिली. आमदारांनी आमच्या शहरातील जनतेची समस्या दूर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शहरातील वाहतूक सुरळीत असली पाहीजे. रस्ते चांगले असले पाहिजे, ही भूमिका आपण ठेवली आहे. प्रशासनाने मंजूर केलेल्या निधीमुळे अनेक कॉलन्यांमधील रस्त्यांचे रूप पालटणार आहे.
नगर परिषदेअंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) सर्वसाधारण योजना २०२६- २७ अंतर्गत हा निधी मंजूर झाला असून, शहरात विविध विकासकामांसाठी एकूण पाच कोटी ३१ लाख ७७ हजार ३३ रुपये निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी शहादेकरांच्या रस्त्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केल्याने पालिकेच्या विकासकामांना आता गती मिळणार आहे, असेही उपनगराध्यक्षा माधवी पाटील म्हणाल्या.
शहादा शहरातील विविध रस्त्यांचे मजबुतीकरण, निर्माण कार्य आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास या निधीतून करण्यात येणार आहे. शहादा शहराचा चौफेर विकास साधण्यासाठी आमचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.
-------------
या रस्त्यांची होणार कामे
प्राप्त झालेल्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्ता (९२ लाख ५९ हजार ९९६ रुपये), छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्ता (९२ लाख ४३ हजार ५३१ रुपये), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते सिद्धार्थनगरपर्यंत रस्ता (७१ लाख १२ हजार ३४९ रुपये), स्टेट बँक ते जुनी मोहिदा चौफुलीपर्यंत रस्ता (८६ लाख १८ हजार ६७३ रुपये), सरवर मंडप ते आनंद बॅटरीपर्यंत रस्ता (९४ लाख ६२ हजार ३९६ रुपये), भारत पेट्रोलपंप (जुनी एचडीएफसी बँक) ते नवा प्रकाश रोडपर्यंत रस्ता (९४ लाख ८० हजार ८८ रुपये) याप्रमाणे रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला. आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून यापुढेही विविध विकासकामे हाती घेतली जातील, असेही माधवी पाटील म्हणाल्या.