सावळदे येथून साडेसहा लाखांच्या मेंढ्यांची चोरी
13536
सावळदे (ता.शिरपूर) : मेंढ्या चोरण्यासाठी चोरट्य़ांनी कापलेली जाळी
सावळदे येथून
४२ मेंढ्यांची चोरी
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २४ : शेतात जाळी लावून कुंपणात बंद केलेल्या ४२ मेंढ्या चोरट्य़ांनी चोरुन नेल्याची घटना सावळदे (ता.शिरपूर) येथे शनिवारी (ता.२४) सकाळी उघडकीस आली. सावळदे शिवारातील सुभाष छगन पाटील यांच्या शेतात ही घटना घडली. शेतातून चोरट्य़ांनी बापू काशीराम भोरकर (वय ५०, रा.वाघापूर ता.साक्री) यांच्या मालकीच्या मेंढ्या तेथून चोरीस गेल्या. श्री भोरकर कुटुंबासह दोन दिवसांपासून मेंढ्या चराईसाठी सुभाष पाटील यांच्या शेतात दाखल झाले आहेत. तेथे झोपडी बांधून मुक्कामी थांबत त्यांनी मेंढ्यांसाठी जाळीचे कुंपण लावून तात्पुरता वाडा केला आहे.
भोरकर यांनी शुक्रवारी (ता.२३) रात्री २५० मेंढ्या चारून आणल्यानंतर त्यांनी कुंपणात बंदिस्त केल्या. रात्री जेवण करून भोरकर कुटुंब झोपी गेले. शनिवारी सकाळी उठून मोजणी केल्यावर एका वाड्यातील ४२ मेंढ्या चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांची किंमत सुमारे सहा लाख ३० हजार रुपये आहे. मेंढ्या कमी असल्याचे कळताच भोरकर यांनी परिसरात शोध घेतल्यानंतरही मेंढ्यांचा मागमूस लागला नाही. घटनास्थळाजवळ वाहनाच्या टायरच्या खुणाही आढळल्या. चोरट्य़ांनी वाड्याची जाळी कापून मेंढ्या चोरल्याचे आढळले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून संशयितांचा शोध घेण्याची मागणी केली.