NSK26H34933
शेगाव : माजी वर्गमित्र स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देताना.
अर्धशतकानंतर जुळले मैत्रीचे रेशीमबंध
शेगावमध्ये स्नेहमेळावा; ५० वर्षांनंतर वर्गमित्रांची पुनर्भेट
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : महाविद्यालयीन जीवनातील मैत्रीचे नाते काळाच्या ओघातही कायम राहते, याचा प्रत्यय ७ ऑक्टोबरला शेगाव येथे आला. मलकापूर येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात १९७० च्या दशकात एकत्र शिक्षण घेतलेल्या वर्गमित्रांचा तब्बल ५० वर्षांनंतर स्नेहमेळावा झाला. येथील आनंद विहार भक्तनिवासात झालेल्या या पुनर्भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आनंदाश्रू, हास्य आणि गीतांच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भावूक झाले.
काळाच्या ओघात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे मित्र नोकरी, व्यवसाय आणि संसाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांत स्थायिक झाले. मात्र, महाविद्यालयीन जीवनातील मैत्री आणि एकमेकांना भेटण्याची ओढ कायम होती. सुभाष अमळनेरकर, रमेश पाटील, अशोक खर्चे आणि डॉ. रामकृष्ण तायडे यांनी पुढाकार घेत ३० ते ३५ वर्गमित्रांचे संपर्क क्रमांक शोधून या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. मलकापूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव आणि मुंबई येथून मित्र या सोहळ्यास उपस्थित होते. विशेष म्हणजे, सर्व मित्रांनी आपल्या सहचारिणींनाही सोबत आणल्याने या भेटीला कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले. रात्रीच्या भोजनानंतर स्नेहमेळाव्याची सांगता झाली.