टुडे १, फ्लायर
------
‘शेळगाव’ पूर्ण भरण्यापासून वंचित.. जबाबदारी कुणाची?
उपशीर्षक
निवृत्त अभियंत्याची तक्रार; तापी पाटबंधारेच्या कार्यकारी संचालकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : एकीकडे दुष्काळाबाबत सर्वच विभागांना शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असताना हतनूरमधून यंदाच्या मोसमात ९१ टीएमसी पाणी वाहून गेले आणि तरीही त्याखालच्या शेळगाव बॅरेजमध्ये पूर्ण पाणी अडविण्यात आले नसल्याची गंभीर बाब ‘सकाळ’ने गुरुवारच्या (ता.८) अंकातून मांडली. या प्रकाराबाबत जलसंपदा विभागातील निवृत्त अभियंत्यानेही तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना पत्र दिले असून शेळगाव पूर्ण न भरल्याबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे.
दुष्काळासंबंधी शासनाकडून महसूल, कृषिसह पाटबंधारे व सर्वच विभागांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यात प्रकल्पांमधील पाणीसाठा करण्याबाबतही निर्देश आहेत. मात्र, हतनूरमधून ९१ टीएमसी पाणी (२५७७.४४ दलघमी) वाहून गेलेले असताना खालच्या शेळगाव बॅरेजमध्ये आजअखेरही (८ ऑक्टोबर) पूर्ण (१०० टक्के) पाणी अडविले गेलेले नाही. आणि १५ ऑक्टोबरपर्यंत ते अडविले जाण्याची शक्यताही धूसर झाली आहे.
निवृत्त अभियंत्याकडून तक्रार
जलसंपदा विभागातील निवृत्त अभियंता तथा हतनूर धरणावर अनेक वर्षे कनिष्ठ अभियंता म्हणून सेवा बजावलेल्या एस.आर. पाटील यांनी तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना यासंदर्भात पत्र दिले आहे. त्यात त्यांनी हतनूरमधून इतके पाणी वाहून गेले, मात्र शेळगाव प्रकल्पात पूर्ण म्हणजे ३.८९६ टीएमसी पाणीसाठा का अडविण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ४ ऑक्टोबर अखेर शेळगाव प्रकल्पात केवळ २.५४ टीएमसी (६५ टक्के) साठाच होऊ शकला. यासंदर्भात जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
-------
कोट
शेळगाव प्रकल्प पूर्ण भरण्यासंदर्भात योग्य नियोजन व त्यासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्क्यांपेक्षा जास्त असून त्यात आवक सुरुच आहे. दररोज १५ सें.मी. पातळी वाढत असून येणाऱ्या काही दिवसांत प्रकल्पातील पाणीसाठा पूर्णत्वाकडे जाईल.
- नीलेश अहिरे
कार्यकारी अभियंता
----------