(पान ३ ला टॉपला घेणे)
---------
KPD26B13431
धमाणे : धुळे तालुक्यात दाखल झालेले मेंढपाळ. (छायाचित्र : जगन्नाथ पाटील)
----------
चाऱ्याच्या शोधार्थ मेंढपाळांची भटकंती
दिवाळीपूर्वीच धुळे तालुक्यात दाखल; पाणीटंचाईचे संकट
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ४ : धुळे जिल्ह्यात यंदा पावसाळा चार पावसातच संपला. ग्रामीण भागात चारा- पाणी टंचाईचे संकट गडद होवू लागले आहे. दरवर्षी दिवाळीनंतर धुळे तालुक्यात दाखल होणारे मेंढपाळ यंदा महिनाभर अगोदरच चाऱ्याच्या शोधार्थ भटकंती करत दाखल झाले आहेत.
शासनाने पहिल्या ट्रीगरमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश केला आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याची पातळी खालावत आहे. शेतातील चारा लवकरच संपेल. गायरान, पडीक जमिनीवरील गवतही सुकून गेले आहे. त्यामुळे हजारो मेंढ्या- शेळ्या जगविण्यासाठी मेंढपाळ कुटुंबियांना स्थलांतर करावे लागत आहे. कापडणे, नेर, नगाव, लामकानी, मुकटी, बोरीस, सोनगीर परिसरातील शेतशिवारात सध्या मेंढपाळांचे वाडे दिसत आहेत. दिवसभर शेताच्या बांधावर, माळरानावर मेंढ्या चारणे आणि रात्री उघड्यावर संसार थाटणे, असे त्यांचे जीवन झाले आहे. पावसाअभावी शेतात रब्बीची पेरणी रखडली असून, शेतकऱ्यांनीही चारा म्हणून बाजरी, ज्वारीचे अवशेष राखून ठेवल्याने विकत चारा घेण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे.
मेंढपाळांनी सांगितले, की दरवर्षी आम्ही दिवाळीनंतर खानदेशात येतो. यंदा आमच्या गावाकडे पाऊस जेमतेम झाला. जनावरांसाठी चाऱ्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. नाइलाजाने लवकर स्थलांतर करावे लागले. आगामी काळात चाराटंचाई गडद होणार आहे. छावण्या सुरू करण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही सोय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. चारा टंचाईचा फटका केवळ मेंढपाळांनाच नव्हे तर शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांनाही बसणार आहे. येत्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.