पान दोन
---------------------
शिंदेदिगरच्या एकलव्य स्कूलचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश
हॅन्डबॉलमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक; विविध क्रीडाप्रकारांत ५ पदकांची कमाई
सकाळ वृत्तसेवा
पळसन, ता. ३: जनजातीय कार्य मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत शिंदेदिगर (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या क्रीडा महोत्सवात शाळेच्या संघाने एकूण पाच पदकांची लयलूट करत राज्यभरात आपल्या उत्कृष्ट क्रीडागुणांचा ठसा उमटवला आहे. विशेषतः, मुला-मुलींच्या हॅन्डबॉल संघांनी सलग तिसऱ्यावर्षी सुवर्णपदक पटकावत हॅट्ट्रिक नोंदवली.
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंसाठी अटीतटीच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या हॅन्डबॉल स्पर्धा गोंदिया जिल्ह्यातील बोरगाव बाजार येथे पार पडल्या. तर मुलींच्या स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, शेंदेगाव येथे झाल्या. या दोन्ही ठिकाणी सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगरच्या खेळाडूंनी कमालीची जिद्द, उच्च दर्जाचे कौशल्य आणि शिस्तबद्ध संघभावनेचे प्रदर्शन करत मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
दोन्ही हॅन्डबॉल संघांना क्रीडा शिक्षिका हेमा गौर यांच्या मार्गदर्शनासह आयुष दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंच्या यशाबद्दल आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, उपआयुक्त विनिता सोनवणे, प्राचार्य श्री. सुरेश नि. देवरे यांनी अभिनंदन केले.
---------------
शाळेने मिळविलेले पदक
हॅन्डबॉल (मुले गट) : सुवर्णपदक (सलग तिसरे वर्ष)
हॅन्डबॉल (मुली गट) : सुवर्णपदक (सलग तिसरे वर्ष)
४०० मीटर धावणे (मुले गट) : रौप्यपदक
१५०० मीटर धावणे (मुले गट) : कांस्यपदक
थाळीफेक (मुली गट) : कांस्यपदक