तरुणाला मारहाणीचा
दोघांवर गुन्हा
शिरपूर : शेतात कूपनलिकेची पक्की पाईपलाईन करू नका, असे सांगितल्यावरून तरुणाला दोघांनी मारहाण केली. ही घटना ३१ ऑक्टोबरला दुपारी शिरपूर शिवारात गट क्रमांक ५४ मधील शेतात घडली. श्रीकांत पुरुषोत्तम गांगुर्डे (वय ४६, रा. प्रोफेसर कॉलनी, शिरपूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. संशयित लंकेश नारायण चौधरी व महेश तथा भय्या नारायण चौधरी (दोघे रा. गायत्री कॉलनी) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी लाकडी दांड्याने मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हवालदार रोकडे तपास करीत आहेत.
---
काका-पुतण्यावर
वनावल येथे वार
शिरपूर : गल्लीत ट्रॅक्टर लावण्यावरुन झालेल्या वादात काका, पुतण्याला तलवार, चाकूने वार करून जखमी केल्याची घटना वनावल (ता. शिरपूर) येथे घडली. विठ्ठल रामदास पाटील (वय ६४, रा. वनावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित कोमलसिंह केसरसिंह राऊळ, गजेंद्र कोमलसिंह राऊळ व मोहन कोमलसिंह राऊळ (सर्व रा. वनावल) यांनी त्यांच्यासह पुतण्या ऋषीकेश यांच्यावर वार करून जखमी केले. हवालदार माळी तपास करीत आहेत.
---
खर्दे येथून
दुचाकीची चोरी
शिरपूर : खर्दे (ता. शिरपूर) येथील ईश्वर सुकलाल भिल यांची दुचाकी (एमएच १८, सीएम ८४३९) २५ ते २६ ऑक्टोबरदरम्यान संशयितांनी घराच्या अंगणातून चोरून नेली. तिची किंमत ५० हजार रुपये आहे. हवालदार बालमुकुंद दुसाने तपास करीत आहेत.