VAK26B01688-1
शिरपूर : नायब तहसीलदार पंकज मगर यांना निवेदन देताना परिषदेचे पदाधिकारी.
------
चिलारेत निकृष्ट रेशन धान्याचे वाटप
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
वकवाड, ता. ३ : चिलारे (ता. शिरपूर) येथील रास्तभाव धान्य दुकान क्रमांक १२६ मधून निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच, नवीन रेशन कार्ड, रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नावे समाविष्ट करणे आणि कोतवाल भरतीतील आरक्षणाचे प्रश्नही प्रलंबित आहेत. या सर्व समस्यांची तातडीने दखल घेऊन त्या मार्गी लावाव्यात, या मागणीचे निवेदन मंगळवारी (ता. ३)अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने शिरपूर तहसील कार्यालयात दिले.
चिलारे येथील रास्त भाव धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याने संतापलेल्या महिला व ग्रामस्थांनी धान्य सोबत घेऊन तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांना दाखविले. गरीब व गरजू कुटुंबांना शासनाकडून मिळणारे धान्य दर्जेदार आणि खाण्यायोग्य असणे आवश्यक आहे. मात्र, निकृष्ट धान्यामुळे ऐन दिवाळीच्यावेळी लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गावातील अनेक पात्र कुटुंबांना अद्याप नवीन रेशन कार्ड मिळालेले नाही ते तत्काळ देण्यात यावे, तसेच काही कुटुंबांतील नवीन सदस्यांची नावे रेशन कार्डमध्ये समाविष्ट झालेली नसल्याने संबंधितांना शासकीय अन्नधान्य योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत अहेत. या कामांसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांत चकरा माराव्या लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोतवाल भरती प्रक्रियेत शासनाच्या प्रचलित आरक्षण नियमांचे पालन करावे, पात्र उमेदवारांना न्याय द्यावा आणि आरक्षणासंदर्भातील प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी. अशी मागणी संघटनेने केली आहे.
या वेळी दीपक पावरा, सतिलाल पावरा, नविस पावरा, मुकेश पावरा, विजयसिंग पावरा, जितेंद्र पावरा, रेवलीबाई पावरा, बबीताबाई पावरा, सकुबाई पावरा, कमलीबाई पावरा, सुनीता पावरा, ललीता पावरा, शोबाबाई पावरा, केलास पावरा, विजय पावरा, नितिन पावरा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.