Shiv Jayanti 2023 : शिवजयंती मिरवणुकीवर CCTVची करडी नजर! डीजेवर बंदी कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Jayanti Miravnuk

Shiv Jayanti 2023 : शिवजयंती मिरवणुकीवर CCTVची करडी नजर! डीजेवर बंदी कायम

नाशिक : शहरात रविवारी (ता. १९) मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होते आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे, शिवजयंती साजरी करताना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मिरवणुकीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसेच, मिरवणुकीत डीजेवर बंदी कायम असल्याचे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. (Shiv Jayanti 2023 CCTV eyes on Shiv Jayanti procession Ban on DJ remains by nashik police commissioner news)

गेल्या महिन्यात नाशिकरोडला देवळाली गावात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा होऊन, गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमुळे शहर पोलिस यंत्रणा सावध झाली असून, शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्ताची आखणी करण्यात आलेली आहे.

शहरभर विविध मंडळांकडून शिवजयंतीची तयारी करण्यात आलेली आहे. त्यासाठी पोलिस आयुक्तालयातर्फे आलेल्या अर्जांना परवानग्यांची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

पोलिस ठाणेनिहाय शांतता समितींच्या बैठक

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, शहरातील पोलिस ठाणे निहाय शांतता समितीच्या बैठक घेतल्या जात आहेत. या बैठकांना शिवजयंती आयोजक समितीचे पदाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहत आहेत.

या बैठकांच्या माध्यमातून पोलिसांकडून आयोजकांना दक्षतेच्या सूचना केल्या जात आहेत. तसेच, समितीकडून आलेल्या सूचनांचीही नोंद पोलिसांकडून घेतली जात आहे.

"शिवजयंतीनिमित्त पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेतल्या जात आहेत. मिरवणुकीत डीजेचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष शाखांसह गोपनीय विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे." - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक