धुळे ः टुडे २ साठी
---
फोटो क्रमांक ः 34938
धुळे ः निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना शिवसेना ‘उबाठा’चे शिष्टमंडळ.
---
पशुधन, गो-तस्करीप्रश्नी चौकशी करा
शिवसेना ‘उबाठा’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ ः जिल्ह्यात होत असलेली पशुधनाची बेकायदेशीर खरेदी-विक्री, तस्करी आणि विविध पोलिस ठाण्यांमधील कारवाईदरम्यान जप्त केलेल्या लाखो रुपयांच्या पशुधनाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. गो-तस्करीचे मुख्य सूत्रधार, त्यांना कथित संरक्षण देणारे राजकीय व्यक्ती आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी जिल्हास्तरावर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात यावे, अशी मागणी करत या पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन दिले.
जिल्ह्यात तीव्र दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी व पशुपालक चारा, पाणी आणि पशुखाद्याच्या टंचाईमुळे आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच पशुधनाची चोरी, गोवंशाची बेकायदेशीर खरेदी-विक्री, संशयास्पद वाहतूक आणि बोगस पावत्यांचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. विविध पोलिस ठाण्यांमध्ये मिळून लाखो किमतीचे गोवंश जप्त होत असले तरी केवळ वाहनचालकांवर कारवाई होते. मात्र, यामागील मुख्य सूत्रधार, व्यापारी, दलाल आणि आर्थिक लाभार्थ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
संशयास्पद जप्ती
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून ३ नोव्हेंबरला ८० ते १०० गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. संरक्षित आवारात एवढ्या मोठ्या संख्येने जनावरे कोणाच्या परवानगीने ठेवण्यात आली? त्यांचे मूळ मालक कोण? तसेच ती बेवारस घोषित करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली होती का? याबाबत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
पक्षाच्या मागण्या
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने पोलिस, महसूल, पशुसंवर्धन, बाजार समिती व ‘आरटीओ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संयुक्त विशेष चौकशी पथक नेमण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमधील मागील काही वर्षांत जप्त केलेल्या पशुधनाचे रेकॉर्ड तपासून परस्परसंबंधांची चौकशी व्हावी. चोरीचे पशुधन खरेदी करणारे व्यापारी, दलाल आणि बोगस पावत्या तयार करणाऱ्या आर्थिक साखळीचा पर्दाफाश करून मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल करावेत. गो-तस्करीला किंवा गैरप्रकारांना कथित संरक्षण देणारे राजकीय व्यक्ती आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी. आठ दिवसांच्या आत विशेष तपास पथक स्थापन करून चौकशीचा अहवाल न दिल्यास जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना ‘उबाठा’ने दिला आहे.