esakal | रेमडेसिव्हिरची खुल्या बाजारात विक्री; सुधाकर बडगुजर यांचा आरोप

बोलून बातमी शोधा

 Remadesivir

रेमडेसिव्हिरची खुल्या बाजारात विक्री; सुधाकर बडगुजर यांचा आरोप

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेऊन महापालिकेने गेटवेल फार्मा या पुरवठादार एजन्सीला सहा हजार इंजेक्शनची ऑर्डर देऊनही पुरवठा न केल्याने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

एप्रिल २०२१ मध्ये महापालिकेने मेसर्स गेटवेल फार्मा या पुरवठादार एजन्सीला सहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरवठा करण्याची जबाबदारी दिली होती. परंतु महापालिकेने केलेल्या करारनाम्याचा एजन्सीने भंग केला आहे. महापालिकेने दिलेल्या आदेशातील सहा हजार इंजेक्शन खुल्या मार्केटमध्ये विक्री करून कोट्यवधींची रक्कम गेटवेल फार्मा एजन्सीने जमा केल्याचा आरोप श्री. बडगुजर यांनी केला आहे.

एजन्सीच्या या कृतीमुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे महापालिकेने केलेले नियोजन चुकले, त्याचा नागरिकांना त्रास झाला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन एजन्सीच्या रिस्क ॲन्ड कॉस्टवरती मायलन कंपनीला जादा भावाने काम द्यावे लागले. या मुळे महापालिकेचे नुकसान झाले असले तरी लोकांची जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. परंतु महापालिकेची फसवणूक करणाऱ्या व्यक्ती किंवा एजन्सीला शिक्षा झाली पाहिजे. त्याचे संपूर्ण देयक थांबविणे गरजेचे आहे. एजन्सीला ब्लॅक लिस्ट करावे व मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्री. बडगुजर यांनी केली आहे.