मजुरास मारहाण;
पाच हजार चोरले
शिरपूर : घराबाहेर उभ्या मजुराला मारहाण करून त्याचे पाच हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. ही घटना ३० ऑक्टोबरला रात्री साडेआठला खर्दे बुद्रुक (ता. शिरपूर) येथील तपनभाई पटेल हॉस्पिटलमागे पत्र्यांच्या खोल्यांजवळ घडली. तोहीत पद्म रसूल शेख (वय ३५, रा. पश्चिम बंगाल) असे मारहाण झालेल्या मजुराचे नाव असून, तो सध्या खर्दे येथे वास्तव्यास आहे. घराबाहेर तांदूळ घेण्यासाठी आला असता, पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमधून उतरलेल्या चौघांनी त्याला हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करीत त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलच्या कव्हरमध्ये शेख याने पाच हजार रुपये ठेवले होते. मोबाईलसह रोकड घेतल्यानंतर संशयितांनी शेख याचा बचाव करण्यासाठी आलेल्या भुराराम शर्मा यालाही मारहाण केली. तेथून चोरटे पसार झाले. शेख याच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, हवालदार रवींद्र आखडमल तपास करीत आहेत.
कोडीद येथून
दुचाकी लंपास
शिरपूर : कोडीद (ता. शिरपूर) येथून घराबाहेर लावलेली स्कूटी चोरीस गेली. ही घटना ३० ऑक्टोबरला रात्री साडेअकराला घडली. मायादेवी सुनील बाविस्कर (वय ५३, रा. कोडीद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीची स्कूटी (एमएच १८, सीएम ७९४१) संशयितांनी चोरून नेली. तिची किंमत ७० हजार रुपये आहे. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हवालदार रूपेश गांगुर्डे तपास करीत आहेत.
बोराडी येथे
दुचाकी चोरी
शिरपूर : बोराडी (ता. शिरपूर) येथील शशांक रंधे यांची स्कूटी (एमएच १८, सीके ५१२८) ३० ते ३१ ऑक्टोबरदरम्यान चोरट्यांनी नेली. तिची किंमत ६० हजार रुपये आहे. सांगवी पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून, हवालदार सागर ठाकूर तपास करीत आहेत.
गळफास घेऊन
युवकाची आत्महत्या
शिरपूर : महामार्गालगत शहादा चौफुलीजवळ गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही घटना १ नोव्हेंबरला घडली. राहुल कन्साराम पावरा (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रकाश चंपालाल जैन याच्या शेताच्या बांधावर बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास लावलेला त्याचा मृतदेह आढळला. थाळनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, हवालदार संजय धनगर तपास करीत आहेत.