NSK26H32935
धुळे ः आग्रा रोडवरील आरएस कलेक्शनमध्ये चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला चोरटा.
---
कापड दुकानात धाडसी चोरी
---
५० हजारांची रोकड, स्प्रे, बेल्ट, शेरवाणी लंपास
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ ः शहरातील मुख्य व्यापारी पेठ असलेल्या आग्रा रोडवरील ‘आरएस कलेक्शन’ या दुकानात शनिवारी (ता. १७) रात्री धाडसी चोरी झाली. शेजारी सुरू असलेल्या बांधकामाच्या आधारे चोरट्याने दुकानाच्या पाचव्या मजल्यावरून प्रवेश केला. दुकानातील सुमारे ५० हजार रुपयांची रोकड, ब्रँडेड कंपनीचे स्प्रे, बेल्ट आणि महागडी शेरवाणी, असा ऐवज लंपास केला. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर असलेले हे दुकान मालक भालचंद तोलाणी यांनी शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे बंद केले. शेजारी सुरू असलेल्या बांधकामाचा आधार घेत चोरट्याने दुकानाच्या पाचव्या मजल्यावर प्रवेश केला. तेथील स्टोअर रूमचा दरवाजा उघडा असल्याने त्याने आत प्रवेश करून सुमारे अर्धा तास दुकानाची झाडाझडती घेतली. रविवारी (ता. १८) सकाळी मालक आणि कर्मचारी दुकानात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानासह परिसरातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले असून, तोंडाला रुमाल बांधलेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.