मेन
लोगो : सकाळ विशेष
फोटो : H33491, H33492, H33494, H33493
...........
शॉर्टकट दुचाकीस्वारांच्या जिवाशी
बंदी असूनही उड्डाणपुलावरून प्रवास; प्रशासनाची उदासीनता
....
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : मुंबई- आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर दुचाकी, रिक्षांसाठी प्रवेश बंदी असताना शहरातील वाहतूक कोंडीचा ससेमिरा टाळण्यासाठी ‘शॉर्टकट’चा अवलंब करीत स्वतःसह सहप्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळला जातो आहे. उघड, उघड वाहतूक नियमांची पायमल्ली होत असताना, वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाकडून सोईस्कररीत्या याकडे डोळेझाक केली जात आहे.
द्वारका चौफुली आणि राणेनगर बोगदा याठिकाणी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कामे सुरू आहेत. यामुळे काही दुचाकीस्वार शॉर्टकटच्या नादात उड्डाणपुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. दोन दिवसांपूर्वीच सिडकोतील महिला वकील शीतल नरुळे यांचा उड्डाणपुलावर अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतरही उड्डाणपुलावरून दुचाकीस्वारांचे प्रमाण कमी झालेले नाही. हा अपघात मोठ्या दुर्घटनेचे संकेत देणारा ठरला असून, वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
....
महामार्गावर १०६ बळी
मुंबई - आग्रा महामार्गावरील शहर हद्दीतल्या उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघातांमध्ये २०२३ ते २०२५ या दरम्यान तब्बल १०६ जणांचा अपघाती बळी गेला आहे. यात सर्वाधिक बळी द्वारका सर्कल (२८) आणि आडगाव टी पॉइंटवर (१७) गेले आहेत.
.....
कोंडीचा ससेमिरा
वारंवार तक्रारींनंतरही उड्डाणपुलावरील लहान वाहनांच्या प्रवेश बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. प्रवेशबंदीचे फलक असले, तरी अनेक वाहनचालक दुर्लक्ष करून सर्रास पुलावरून प्रवास करीत आहेत. विशेष म्हणजे वाहनांवर किंवा बंदी मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई होत नसल्याने नियम मोडणाऱ्यांचे फावते आहे. शहरातील बहुतांशी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आहे. त्यातच, झटपट पोचण्यासाठी अनेकजण उड्डाणपुलावरून जाण्याचा पर्याय निवडतात. परंतु हाच शॉर्टकट जीवघेणा ठरतो आहे.
...
अपघाताला निमंत्रण देणाऱ्या बाबी
- उड्डाणपुलावर लहान वाहनांना प्रवेशबंदी असूनही सर्रास वापर
- दुचाकींची नियमबाह्य उड्डाणपुलावरून प्रवास
- वाहतूक पोलिसांकडून प्रभावी कारवाईचा अभाव
- प्रवेशबंदी फलकांकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष
.......
तातडीने आवश्यक उपाययोजना
- उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना भौतिक अडथळे उभारणे
- सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
- वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती
- पर्यायी मार्गांचे स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे
- उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई
- रिक्षा, दुचाकी वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई
--- कोट
फोटो : H33511
उड्डाणपुलावर गरवारे पॉइंट ते इंदिरानगर बोगदा या तिहेरी लेनवर दुचाकीवाहनांना परवानगी आहे. मात्र, इंदिरानगर बोगदा ते आडगाव या दरम्यान दुचाकी व लहान वाहनांना प्रवास करण्यास परवानगी नाही. या मार्गावर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे विशेष पथक कार्यान्वित असून, संबंधित दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
- माधव रेड्डी, सहायक पोलिस आयुक्त, शहर वाहतूक शाखा