३०-२
---------
श्रीचक्रधर व्याख्यानमालेचा
कसबेसुकेणे येथे समारोप
-----------------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२२ : नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या प्रेरणेने प्रत्येक वर्षी श्रीदत्तमंदिर, मौजे सुकेणे येथे गेल्या ४० वर्षांपासून नवरात्रकाळात ''श्रीचक्रधर व्याख्यानमाला'' आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी (दि. २० ) रोजी मौजे सुकेणे येथील रामराव मोगल यांच्या मळ्यात झाला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी महंत अर्जुनराज सुकेणेकर होते. महानवमीच्या दिवशी शांत वातावरणात देवपूजा वंदन, नामस्मरण करण्यासाठी गावाबाहेर विजनात जाण्याची महानुभाव पंथात परंपरा आहे. त्यानुसार मंगळवारी (ता.२०) येथील साधक व जिल्ह्यातील भक्तांच्या उपस्थितीत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत देवपूजा, प्रसादवंदन, धर्मसभा व व्याख्यानमाला समारोप पार पडला. या धर्मसभेत प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर, डॉ. किरण देशमुख व दत्तराजशास्त्री सुकेणेकर यांची प्रबोधनात्मक व्याख्याने झाली.
व्याख्यात्यांनी श्रीचक्रधर स्वामींचा स्त्रीविषयक उदार दृष्टिकोन, भूतदया व समतेचे विचार यावर मार्गदर्शन करत उपस्थितांचे प्रबोधन केले. गोपीराजशास्त्री सुकेणेकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘मविप्र’ संस्थेचे सभापती डी. बी. मोगल यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन रामराव मोगल, शामराव मोगल, प्रकाश मोगल, किरण मोगल व डी. बी. आप्पा मोगल यांनी केले होते. देवपूजेचे आयोजन बाळकृष्ण सुकेणेकर, राजधर सुकेणेकर, महंत आळसपूरकर , सुभद्राबाई सुकेणेकर, श्रीधरानंद सुकेणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. या प्रसंगी नाशिक शहर- जिल्ह्यातील भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------