धार्मिक पर्यटन
---
फोटो क्रमांक : 31917
धुळे : श्री एकवीरा देवीची विलोभनीय मूर्ती.
-
फोटो क्रमांक : 31918
धुळे : श्री एकवीरा देवी मंदिराचे दाक्षिणात्य शैलीतील गोपुरम प्रवेशद्वार.
--
श्री एकवीरा देवी : २५० कुळांची कुलस्वामिनी
---------------------------------------
धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी धार्मिक स्थळांचे महत्त्व अनन्यसाधारण ठरत आहे. खानदेशची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवे शक्नीपीठ मानले जाणारे धुळ्यातील श्री आदिशक्ती एकवीरा देवी व जुने धुळे येथील रेणुका माता मंदिर याचे उत्तम उदाहरण आहे. खानदेशसह महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील २५० पेक्षा जास्त कुळांचे कुलदैवत असलेल्या या मंदिराचा आता आधुनिक सोयी-सुविधांसह कायापालट होत आहे.
- धनंजय सोनवणे, धुळे
धुळ्याच्या देवपूर भागात पांझरा नदीकाठी वसलेले हे मंदिर सुमारे ५०० वर्षे प्राचीन आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, अशी आख्यायिका आहे. हेमाडपंथी वास्तुकलेच्या या गर्भगृहात देवीची स्वयंभू, अष्टभुजा, शेंदूरचर्चित व पद्मासनात बसलेली मूर्ती विराजमान आहे. दगडी कमानी दरवाजा, नगारखाना, दीपमाळ आणि दाक्षिणात्य शैलीतील गोपुरम प्रवेशद्वार हे मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. मुख्य मंदिरासोबतच परिसरात महालक्ष्मी, भगवान परशुराम, शितला माता, खोकला माता, हनुमान, महादेव, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि कालभैरवाचे प्राचीन स्थान आहे.
परिसरात आधुनिक सुविधा
राज्य शासनाच्या पर्यटन विकासाच्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून व भाविकांच्या देणगीतून मंदिराचा पर्यटन स्थळ म्हणून कायापालट होत आहे. सहा एसी रूम्स व हॉल असलेले भक्तनिवास, सभामंडप दुरुस्ती, घाट सुशोभीकरण, जलकुंभ, यज्ञ मंडप, संरक्षण भिंत, पथदिवे व स्वच्छतागृहांची सोय केली आहे. लवकरच सोलर सिस्टीम, विवाह सोहळ्यांसाठी अल्प दरात भोजन व्यवस्था आणि मोफत अन्नछत्र सुरू करण्याचा मानस आहे. पालखीसाठी ३५ लाखांचा १८ फूट पितळी रथ साकारला आहे.
सामाजिक बांधिलकी
१९५५ मध्ये स्थापन झालेला ‘श्री एकवीरा देवी आणि रेणुका माता मंदिर ट्रस्ट’ कोणत्याही शासकीय अनुदानाविना लोकसहभागातून कामकाज सांभाळतो. कोरोना काळात गरजूंना किराणा साहित्य देऊन ट्रस्टने सामाजिक भान जपले. मुख्य विश्वस्त सोमनाथ निंबा गुरव यांच्यासह मनोहर गुरव, मधुकर गुरव, नंदलाल सोनवणे, महेश गुरव, सदाशिव पुजारी, संजय गुरव, सुनील गुरव, पंकज गुरव, गजानन सूर्यवंशी, विशाल पुजारी आणि चंद्रशेखर गुरव हे सर्व पदाधिकारी मंदिराचे सुशोभीकरण, स्वच्छता व वृक्षसंवर्धनाचे काम निष्ठेने पाहत आहेत. वर्षभरात शारदीय व चैत्र नवरात्रोत्सव, चैत्र गुढीपाडवा, ५६ भोग नैवेद्य, कोजागिरी पौर्णिमा, दीपोत्सव आणि कालभैरव जयंती यांसारखे धार्मिक कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडतात. धार्मिक परंपरा आणि आधुनिक सोयी-सुविधांचा सुरेख संगम साधल्यामुळे हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.