धुळे : टुडे १ साठी..मेन
--
दोन कॉलम फोटो क्रमांक : 31880
धुळे : पांझरा नदीकिनारी असलेल्या मंदिरातील श्री एकवीरादेवीची मूर्ती.
--
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात
-
जिल्ह्यात चैतन्यमयी वातावरण; धुळ्यात श्री एकवीरादेवी मंदिर चोवीस तास खुले
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : स्त्रीशक्तीच्या उपासनेचा शारदीय नवरात्रोत्सव रविवारपासून (ता. ११) सुरू होत असून, घटस्थापनेनंतर देवीच्या उपासनेला प्रारंभ होईल. नऊ दिवस शहरासह जिल्ह्यातील देवींच्या मंदिरांत भक्तिमय वातावरण असेल. दर्शनासाठीची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापनांनी नियोजनावर भर दिला आहे. तसेच, राज्यातील पाचवे शक्तिपीठ असलेल्या धुळे शहरातील श्री एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिरातही शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ होईल. यानिमित्त हे मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येईल. नऊ दिवसांच्या या महोत्सवासाठी एकवीरादेवी मंदिर परिसरात सप्तरंगी रोषणाई करण्यात आली आहे. देवीला रोज वेगवेगळ्या रंगांच्या साड्यांचे (वस्त्रलंकार) वस्त्राभरण केले जाईल. या काळात रोज पाच वेळा महाआरती होणार आहे. या उत्सवाच्या जय्यत तयारीमुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील खानदेशची कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी, पांझरा नदीकिनारी श्री कालिकामाता, श्री चामुंडामाता, शिरूड येथील श्री कालिकादेवी, भटाई येथील श्री भटाईदेवी, चिमठाणे येथील श्री पेडकाईमाता, पाटण (ता. शिंदखेडा) येथील आशापुरीमाता, महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमेवरील श्री बिजासनीमाता, म्हसदी (ता. साक्री) येथील श्री धनदाईमाता, कोकले येथील श्री नागाईमाता, निजामपूर येथील म्हसाईदेवी आणि रावेर (ता. धुळे) येथील श्री नंदाभवानीदेवीसह विविध मंदिरांमध्ये स्वच्छता, सजावट आणि पूजेची तयारी करण्यात आली आहे. मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शनिवारी घरोघरीही घटस्थापनेची तयारी सुरू होती. पूजेसाठी लागणारे घट, फुले, हार, नारळ, फळे आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग दिसली. नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. उपवास, जप, पारायण, आरती, भजन-कीर्तन यांसह गरबा आणि दांडियाच्या माध्यमातून भक्तिभाव व्यक्त केला जातो. विजयादशमीला दसऱ्याच्या पूजनाने उत्सवाची सांगता होईल.
-
चोख पोलिस बंदोबस्त
येथील श्री एकवीरादेवी मंदिरात हजारोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, चोख पोलिस बंदोबस्त आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हा धार्मिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री एकवीरादेवी मंदिर ट्रस्ट मंडळ, पुजारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन या मंदिर ट्रस्टसह व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
१४-१
...चौकट...
१४-१
श्री एकवीरादेवी मंदिरातील कार्यक्रम
महाआरतीची वेळ : पहाटे ५, सकाळी ८, दुपारी १२, सायंकाळी ७ आणि रात्री १२ वाजता. महाआरतीच्या यजमानपदासाठी इच्छुकांनी मंदिर कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. प्रमुख धार्मिक कार्यक्रम : ११ ऑक्टोबर- घटस्थापना, महापूजा व महाआरतीने उत्सवाची सांगता/सुरुवात. १५ ऑक्टोबर (ललिता पंचमी)- सकाळी १० ला माहेश्वरी महिला मंडळ, मारवाडी युवा मंच व अग्रवाल महिला धार्मिक समितीच्या सहकार्याने १०१ कुमारिकांचे पूजन. १७ ते १९ ऑक्टोबर- होम,हवन व शतचंडी यज्ञ पूर्णाहुती (भाविकांना यज्ञाचे यजमानपद घेण्याची संधी). २० ऑक्टोबर (महानवमी व विजयादशमी)- सकाळी १० ला सुवासिनी पूजन आणि सायंकाळी पारंपरिक पद्धतीने सीमाउललंघन व शमी पूजन सोहळा. २५ ऑक्टोबर (कोजागिरी पौर्णिमा)- मंदिराच्या प्रांगणात देवीला ५६ भोग नैवेद्य अर्पण. सायंकाळी गोरज मुहूर्तावर व रात्री ८ ला संगीतमय जागरणाचा कार्यक्रम (प्रसादासाठी कार्यालयात पूर्वकल्पना देण्याचे आवाहन).