सिद्धिनाथ महाराजांचा
त्रितपपूर्ती सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : श्रमिकनगर येथील जागृत दत्त देवस्थान दत्तपीठ श्रीक्षेत्र अवधूतगड येथे श्री संत सिद्धिनाथ महाराजांच्या ३६ वर्षांच्या खडतर साधनेच्या पूर्ततेनिमित्त आयोजित त्रितपपूर्ती सोहळा उत्साहात झाला. यानिमित्त अवधूत संस्कृत ग्रंथालय, वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन, वृक्षारोपण तसेच महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले.
आमदार सीमा हिरे व महेश हिरे यांच्या हस्ते संत सिद्धिनाथ महाराजांचे पूजन करून संस्कृत ग्रंथालय व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक शहर जनपद कार्यवाह सुहास वैद्य यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन झाले. वैद्य यांनी देवस्थानात सुरू असलेल्या आध्यात्मिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार हिरे यांनी आगामी डिसेंबरमधील विधिमंडळ अधिवेशनात श्रीक्षेत्र अवधूतगडाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी मिळविण्याबाबत प्रस्ताव मांडणार असल्याचे सांगितले. तसेच भाविकांसाठी रस्ते, वीज व पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवधूतगडावरील निसर्गरम्य वातावरण, पावित्र्य आणि दत्तप्रभूंच्या जागृत स्थानाची अनुभूती भाविकांना येते, असेही हिरे यांनी नमूद केले. या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.