‘भोंगा‘यण प्रकरणी पोलिसांकडून दणका; मालेगावी भोंग्याविना अजान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

loudspeakers on masjid

‘भोंगा‘यण प्रकरणी पोलिसांकडून दणका; मालेगावी भोंग्याविना अजान

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) बालेकिल्ला एकेकाळी ओळखला गेलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ‘भोंग्या‘च्या ‘अल्टिमेटम'नंतर काय होणार? याकडे राज्याची नजर खिळली होती. शहरातील दूध बाजारमधील भोंग्यावर पहाटे अजान सुरु होताच माजी नगरसेविका सुजाता डेरे आणि ५ महिलांनी भोंगे आंदोलनाला सुरवात केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात ‘भोंगा‘यणच्या घटना घडत असताना पोलिसांनी केलेल्या कारवायानंतर शांततेचे वातावरण राहिले. मालेगावमधील बहुसंख्य मशिदींमध्ये पहाटे आणि दुपारी भोंग्याविना अजान झाली.

मनसेच्या कृतीला पोलिसांकडून हद्दपारीची (Deportation) कारवाईचे उत्तर देण्यात आले. २९ पदाधिकाऱ्यांना १५ दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले. २२७ पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजवाण्यात आल्या असून ११९ जणांवर जमावबंदी अंतर्गत कारवाई करण्यात आली, तर २७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. भद्रकाली, सातपूर, इंदिरानगर भागात मशिदींसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. सातपूरला मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न झाल्यावर पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जूने नाशिक भागात छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तणावाच्या परिस्थितीमुळे बाशी ईद घरात करणे अनेकांनी पसंत केले.

हेही वाचा: ‘लिफ्ट प्लिज’ला वाहनचालकांचा ‘ठेंगा’; इंधन दरवाढीचे ‘साईड इफेक्ट’

वडाळा गावात मशिदीवरील भोंग्याद्वारे अजान झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पाथर्डीतील मशीद आणि फाळके स्मारकाशेजारील दर्ग्यावरील भोंगा उतरवण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले. इंदिरानगरमधील हॉटेलमधून पोलिसांनी मनसेच्या १४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. नाशिक रोडला मनसेतर्फे मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.

हेही वाचा: कुपनलिकाच तहानलेली; पाणीटंचाईमुळे ग्रामस्थ हैराण

भोंग्यांच्या संरक्षणासाठी मनमाडमध्ये मोर्चा

मालेगावमधील अपर जिल्हाधिकाऱ्यांना मनसेतर्फे अनाधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले. तसेच मनमाडचे मनसे शहराध्यक्ष सचिन शिरुड यांच्यासह ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी भोंग्यांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे मनमाडमध्ये मोर्चा काढण्यात आला. नामपूरला मशिदीसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पिंपळगावला मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस दिल्या आहेत. निफाडमध्ये सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून राहिली. घोटीमध्ये सामाजिक ऐक्याचे दर्शन घडत असताना एकमेकांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला गेला.

ठळक नोंदी

- मनसेचे प्रमुख नेते ‘नॉटरिचेबल' राहिल्याने दुसऱ्या फळीची सक्रियता

- पहाटेपासून पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सुरु केली धरपकड

- महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांच्या कारवाईला जावे लागले सामोरे

Web Title: Silence After Police Take Action Due To Mns Loudspeaker Incident Malegaon Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top