सिंहस्थापूर्वी द्वारका- दत्तमंदिर रस्ता होणार सहापदरी
२२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर; निविदेमुळे ८४ कोटींची बचत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० वरील द्वारका सर्कल ते दत्तमंदिर चौक या अत्यंत वर्दळीच्या मार्गाच्या सहापदरी रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयाने नाशिक महापालिकेला यासंदर्भात पत्र पाठवून या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. या प्रकल्पाला मंत्रालयाने ३ जून २०२६ रोजी अंतिम मंजुरी दिली असून, त्यासाठी २२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या तांत्रिक नोंदीनुसार, द्वारका ते दत्तमंदिर चौक हा ५.६५० किलोमीटर लांबीचा मार्ग सध्या २४ ते ३० मीटर रुंदीच्या हद्दीत आहे. सिंहस्थापूर्वी हा मार्ग ४५ मीटर रुंद करण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार मुख्य सहा पदरी रस्त्यासोबत दोन्ही बाजूला दोन पदरी सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) उभारले जाणार आहेत. त्यामुळे द्वारका ते नाशिक रोड दरम्यान होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या रुंदीकरणासाठी ४५ मीटर रस्त्याची जागा उपलब्ध करून देण्याची अट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातली होती. महापालिकेने यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने राबवली असून ९० टक्के जागा ताब्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कलम ३-जी अंतर्गत भूसंपादनाचा निवाडा पूर्ण झाल्याने हा प्रकल्प ईपीसी (इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट, कंस्ट्रक्शन) पद्धतीने राबवला जाणार आहे.
--चौकट
महापालिकेला दिलासा
या कामासाठी महापालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत एकूण १५ कंत्राटदारांनी सहभाग घेतला होता. छाननीनंतर १२ कंपन्या पात्र ठरल्या. यामध्ये व्ही. पी. सेठी या कंपनीने सर्वात कमी म्हणजे तब्बल ३८ टक्के कमी दराने निविदा भरली आहे. या कंपनीने १३८ कोटी रुपयांमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली असून सर्व तांत्रिक अटींची पूर्तता केल्याने त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. कमी दराच्या निविदेमुळे महापालिकेची तब्बल ८४ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
--कोट
निविदा प्रक्रियेत १२ कंत्राटदार पात्र ठरले होते. त्यापैकी व्ही. पी. सेठी यांनी ३८ टक्के कमी दराची निविदा भरल्याने महापालिकेची मोठी बचत झाली आहे. सिंहस्थापूर्वी हे रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका