पान २ मेन
सकाळ विशेष
सिंहस्थाचा लोगो वापरावा
.......
सिंहस्थ ‘ध्वजारोहणा’वर सीसीटीव्हीचा ‘वॉच’
तात्पुरते दोन कंट्रोल रुम कार्यान्वित होणार : गोदाघाटावर कडेकोट पोलिस बंदोबस्त
....
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २७ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (ता. ३१) दुपारी गोदाघाटावरील रामतीर्थ येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण व सायंकाळी गोदाआरती होणार आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोदाघाटावर शंभर ते दीडशे उच्चप्रतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. याच ठिकाणी दोन कंट्रोल रुमही तात्पुरत्या स्वरुपात उभारले जाणार असून, कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती तात्काळ बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांना मिळू शकणार आहे.
....
ध्वजारोहणाने कुंभमेळ्याचा प्रारंभ होत आहे. नाशिकचे ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (ता.३१) दुपारी बाराच्या सुमारास तर, त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी रामतीर्थाच्या दोन्ही बाजूने आसनव्यवस्था असेल. देवमामलेदार पटांगणापासून रोकडोबा मैदानापर्यंत नागरिकांसाठी आसनव्यवस्था असेल. यावेळी हजारो भाविक गोदाघाटावर येण्याची शक्यता असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.
.....
सीसीटीव्हीचा वॉच
राष्ट्रपतींसह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती शहरात असल्याने पोलिस आयुक्तालयातर्फे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. या संपूर्ण सोहळ्यावर करडी नजर ठेवण्यासाठी सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी दोन कंट्रोल रुमही तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणार आहे. यातील एक कंट्रोल रुम हे लेवा पाटीदार भवन याठिकाणी तर, दुसरे कंट्रोल रुम सरदार चौक पोलिस चौकीत उभारले जाणार आहे. या सीसीटीव्हींच्या माध्यमातून गर्दीतील प्रत्येकांवर नजर ठेवण्यासह गोदाघाटावर येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरही पोलिसांना लक्ष ठेवता येणार आहे. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यास पोलिसांना मदतच होणार आहे.
------------
कोट (फोटो : H33718)
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे ते दोन दिवसात बसविले जातील. सोहळ्याच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने ते अत्यंत महत्त्वाचे आहे. शुक्रवारपासूनच गोदाघाटावरील रस्ते बॅरिकेटिंग करून बंद केले जातील.
- मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक, नाशिक.
------