तीन ध्वज, तीन स्थळे; सिंहस्थाच्या परंपरेला आधुनिक घाटांची जोड

तीन ध्वज, तीन स्थळे; सिंहस्थाच्या परंपरेला आधुनिक घाटांची जोड
Published on: 
लोगो : सिंहस्थ तीन ध्वजांतून उलगडणार सिंहस्थाची आध्यात्मिक वीण! कुशावर्त, रामतीर्थ आणि नव्या गोदावरी घाटावर ध्वजस्तंभ उभारण्याचे नियोजन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण ही केवळ धार्मिक परंपरा नसून, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्वतंत्र तीर्थमाहात्म्यांना जोडणारी आध्यात्मिक परंपराही आहे. आगामी सिंहस्थासाठी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ, पंचवटीतील रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील नवीन गोदावरी नदीघाट अशा तीन ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्याचे नियोजन आहे. या तीन ध्वजांमधून ‘गोदावरी’च्या पौराणिक अवतरणाची श्रद्धा, प्रभू श्रीरामांच्या वनवासकालीन स्मृती आणि बदलत्या काळानुसार स्नानव्यवस्थेची गरज अधोरेखित होईल. कुशावर्त : ‘गोदावरी’च्या अवतरणाची साक्ष त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाचे माहात्म्य गौतम ऋषींच्या तपश्चर्येशी आणि ‘गोदावरी’च्या पृथ्वीवरील अवतरणाशी जोडलेले आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, गौतम ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी गंगेला पृथ्वीवर अवतरित होण्याचा मार्ग दाखविला. ब्रह्मगिरी पर्वतावरून ‘गोदावरी’चा प्रवाह सुरू झाल्याची श्रद्धा आहे. या पवित्र नदीच्या तीर्थपरंपरेत कुशावर्ताला विशेष स्थान असून, सिंहस्थात येथे स्नान करण्याला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामतीर्थ : रामायणकालीन श्रद्धेचा वारसा पंचवटीतील रामतीर्थाला प्रभू श्रीरामांच्या वनवासकालीन वास्तव्याच्या परंपरेमुळे विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. नाशिकचा परिसर दंडकारण्याचा भाग असल्याची मान्यता आहे. रामतीर्थ परिसरातील गोदावरी स्नान, पितृतर्पण आणि विविध धार्मिक विधींमुळे या क्षेत्राचे तीर्थमाहात्म्य अधोरेखित होते. त्यामुळे रामतीर्थावरील ध्वज हा रामायणकालीन श्रद्धा आणि ‘गोदावरी’च्या पावित्र्याशी जोडलेल्या परंपरेचे प्रतीक ठरेल. नवा घाट : परंपरेबरोबर व्यवस्थेची गरज त्र्यंबकेश्वर परिसरातील नव्या ‘गोदावरी’ घाटावर तिसरा ध्वज उभारण्याचे नियोजन आहे. या घाटाशी संबंधित स्वतंत्र प्राचीन आख्यायिकेचा ठोस संदर्भ उपलब्ध नसला, तरी सिंहस्थातील वाढती भाविक संख्या आणि कुशावर्त तीर्थावरील मर्यादित जागा लक्षात घेता पर्यायी स्नानव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने या घाटाचे महत्त्व वाढते. त्यामुळे नव्या घाटावरील ध्वज हा धार्मिक परंपरेच्या विस्ताराबरोबरच कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनातील बदलत्या गरजांचेही प्रतीक ठरू शकतो. ध्वजांवरील रत्नांतून समुद्रमंथनाचा संदर्भ समुद्रमंथनाच्या पौराणिक कथेत देव-दानवांचा संघर्ष, अमृतप्राप्ती आणि कुंभपर्वाची संकल्पना यांचा संबंध जोडला जातो. या मंथनातून लक्ष्मी, ऐरावत, उच्चैःश्रवा, कौस्तुभ मणी आणि अमृतकलश यांसारख्या दिव्य रत्नांची प्राप्ती झाल्याचे पुराणांत वर्णन आहे. सिंहस्थाच्या ध्वजस्तंभांवरील रत्नप्रतिमांमधून या पौराणिक परंपरेचे प्रतीकात्मक दर्शन घडू शकते. मात्र, प्रत्यक्ष ध्वजांवर कोणत्या रत्नांच्या प्रतिकृती असतील, याबाबत अद्याप अंतिम स्पष्टता नाही. तीन ध्वजांचा आध्यात्मिक अन्वयार्थ कुशावर्तातील ‘गोदावरी’च्या अवतरणाची श्रद्धा, पंचवटीतील प्रभू श्रीरामांच्या स्मृती आणि नवीन ‘गोदावरी’ घाटातून अपेक्षित असलेली पर्यायी स्नानव्यवस्था या तिन्हींचा संगम आगामी सिंहस्थाच्या ध्वजारोहणात दिसेल. त्यामुळे हे तीन ध्वज केवळ धार्मिक प्रतीक न राहता प्राचीन तीर्थपरंपरा, पौराणिक श्रद्धा आणि आधुनिक कुंभमेळा व्यवस्थापन यांना जोडणारे प्रतीक ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com