जिल्हा मुख्यालयातून ...
---
सिंहस्थ ध्वजारोहणाची रंगीत तालीम
-----------------------------
सिंहस्थ कुंभमेळा पर्वाच्या ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असताना सिंहस्थाच्या अपूर्ण कामांमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे स्थानिकांच्या विश्वासाला पात्र ठरताना जागतिक पातळीवर ध्वजारोहण सोहळ्याच्या भव्यदिव्य नियोजनाचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
- गौरव जोशी
नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थ पर्वास येत्या शनिवारी (ता.३१) ध्वजारोहण सोहळ्याने प्रारंभ होत आहे. या सोहळ्यासाठी देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या आहेत. त्यामुळे साहजिकच सोहळ्याची भव्यदिव्यताही अधिक असणार यात शंका नाही. प्रशासकीय यंत्रणा त्यादृष्टीने तयारीत गुंतली आहे. यंदाचा सिंहस्थ पर्वकाळ २२ महिन्यांचा आहे. हा पर्वकाळ लक्षात घेता शासन-प्रशासनाकडून सिंहस्थाच्या सुक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार सिंहस्थ पर्वात १० लाख साधु-महंत तसेच १२ कोटी भाविकांसह जिल्ह्यात भेट देतील. त्यानुसार प्रकल्प हाती घेतानाच येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता व त्यांच्यासाठीच्या सोयीसुविधा तसेच स्थानिकांचा विचार करून दीर्घ मुदतीच्या प्रकल्पांचा त्यात समावेश असल्याचा प्रचार-प्रसार प्रशासन करीत आहे. त्यामध्ये रिंगरोड, एसटीपी प्रकल्प, महामार्ग व रेल्वेचे जाळे मजबुतीकरणासह निरनिराळ्या प्रकारच्या ३५० हून अधिक कामांचा समावेश आहे. यामधील सुमारे ८० टक्के कामे मार्च ते मे २०२७ पर्यंत पूर्ण होतील असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, प्रशासनाच्या तयारीची खरी कसोटी येत्या ३१ तारखेला ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजनातून दिसून येईल.
ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज होत असून दोन्ही शहरांमध्ये वातावरण निर्मिती केली जात आहे. यंदाचा ध्वजारोहण सोहळा जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी शंखनाद, साडेसहा हजार आदिवासी बांधवांच्या साक्षीने महागोदाआरती, कुंभमेळ्यावरील डॉक्युमेंन्टेशन, गोदा गीत अशा निरनिराळ्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा या सोहळ्याला साज असणार आहे. त्यामुळे नाशिकचे नाव जगभरात वेगळ्या रूपात पोहचण्यास मदत होईल, असा प्रशासनाला विश्वास आहे. पण, त्याचवेळी ध्वजारोहण सोहळ्याचे मुख्य ठिकाण असलेले नाशिकचे रामकुंड व त्र्यंबकेश्वरचे कुशावर्त तीर्थ परिसरातील सुशोभिकरण, डागडुजी व इतर कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. या कामांची स्थिती बघता ध्वजारोहणापूर्वी ती पूर्णत्वास जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सध्याच्या या दोन्ही परिसरात झाकपाक करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, ही मलमपट्टी तेवढ्यापुरती मर्यादित असली तरी प्रत्यक्षात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
ध्वजारोहण सोहळ्यासाठी रामकुंड तीर्थात पाणी आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर ऊभे ठाकले आहे. कारण दुष्काळी परिस्थितीत धरणांमधील पाणी सोडण्यावर बंदी आहे. त्यामुळे शेती, पिण्यासाठी तसेच नांदुरमध्यमेश्वरमधील परदेशी पक्षांचे निमित्त पुढे करून पाणी सोडण्याचा खटाटोप सुरु आहे. पण, ही झाली एक बाब. पण, सिंहस्थाच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या कामांची प्रगती म्हणावी, तशी समाधानकारक नाही. नाशिक व त्र्यंबकेश्वरवासीयांना त्याची पदोपदी प्रचिती येत आहे. या कामांमुळे नाशिकचा आणि पर्यायाने जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल, अशी प्रसिद्धी प्रशासकीय पातळीवर करण्यात येत आहे. येत्या काळात प्रशासनाचा हा दावा सत्यात उतरेलही परंतु, सिंहस्थाच्या सध्याच्या अपूर्ण कामांमुळे सर्वसामान्यांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. त्यातच ध्वजारोहण सोहळ्या निमित्ताने ३० व ३१ तारखेला शहर-परिसरात दैनंदिन जीवनमानावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने सिंहस्थाचे भव्यदिव्य नियोजन करताना किमान स्थानिकांचा विचार करावा, एवढीच नाशिककरांची अपेक्षा आहे.
-----------------