ध्वजारोहणाला गोदावरी खळाळणार
सिंहस्थ कुंभमेळा : गंगापूरमधून आवर्तन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होत आहे. या सोहळ्यासाठी गोदावरी खोऱ्यातील पाणीवापर संस्थांच्या मागणीच्या आधारे आवर्तन सोडण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. गंगापूर धरण समूहातील अंदाजे दीडशे ते दोनशे दशलक्ष घनफूट पाणी त्यासाठी दिले जाणार असल्याचे समजते. त्यामुळे ऐन दुष्काळात गोदावरी नदी पुन्हा एकदा खळाळणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटीतील रामतीर्थ येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होणार आहे. या सोहळ्यास राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह केंद्र व राज्यातील महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. परंतु, एकीकडे ही तयारी सुरू असतानाच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धरणांतील पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे कोरड्याठाक गांधी तलाव आणि रामतीर्थात पाणी कसे आणायचे, कोठून आणायचे, या विवंचनेने प्रशासनाला ग्रासले होते. मात्र, प्रशासनाने आवर्तनाच्या नावाखाली आता रामतीर्थ भरण्याची तयारी सुरू केली आहे.
दुष्काळी परिस्थितीत धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव असणार आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणाला गोदाघाटावरील गांधी तलाव तसेच रामतीर्थ कसे भरायचे, असा यक्षप्रश्न प्रशासनासमोर होता. पण, गोदावरी खोऱ्यातील पाणीवापर संस्थांच्या मागणीनिहाय आवर्तन सोडण्याची तयारी केली जात आहे. खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यास दुजोरा दिला आहे. त्यानुसार गंगापूर धरण समूहातून अंदाजे १५० ते २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार असल्याचे कळत आहे. आवर्तनाच्या नावाखाली एकाच दगडात दोन पक्षी टिपण्याचे काम प्रशासनाने केले आहे.
मागणी प्रत्यक्षात उतरणार
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे पंधरवड्यापासून रामतीर्थ व परिसर कोरडेठाक करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरगावहून श्राद्धविधीसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. तर कोरड्या पात्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याची स्थानिकांची तक्रार होती. त्यामुळे गोदावरीत पाणी सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र, प्रशासनाच्या मध्यम मार्गामुळे गोदावरी पुन्हा एकदा खळाळून वाहणार आहे.