धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H31798
धुळे ः ज्येष्ठ उद्योजक तथा भाजप नेते ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंसह धान्य किट वितरणप्रसंगी उपस्थित अल्पा अग्रवाल, राकेश लगडे, दीपाली चौधरी, वैशाली गिते, दीपक भागवत, देवा कंढरे, रवी बोरसे, संवादिनी लीना महाले आदी.
---
एकल पालक विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट
ओमप्रकाश अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ ः भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शहरातील विविध वस्त्यांमधील अनाथ व एकल पालक कुटुंबांतील १४७ गरजू विद्यार्थ्यांना भाजपच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’च्या प्रदेश प्रभारी अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंसह धान्य किटचे वाटप करण्यात आले.
आमदार अनुप अग्रवाल यांच्या येथील मालेगाव रोडवरील जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (ता. ८) अग्रवाल परिवार व अनुलोम संस्थेच्या माध्यमातून वस्तीमित्रांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. आमदार अग्रवाल यांनी ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात जाहीर केल्याप्रमाणे एकल पालक असलेल्या गरजू विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दैनंदिन जीवनात आधार मिळावा आणि त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी व्हाव्यात, या उद्देशाने जीवनावश्यक वस्तूंसह धान्य कीटचे वितरण करण्यात आले. यापैकी ७० विद्यार्थ्यांसह पालकांना आमदार कार्यालयात बोलावून अग्रवाल यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. उर्वरित ७७ विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे धान्य किट सुपूर्द करण्यात आले. या वेळी अनुलोम मित्र दीपाली चौधरी, वैशाली गिते, दीपक भागवत, देवा कंढरे, रवी बोरसे, धुळे शहर भाग संवादिनी लीना महाले, धुळे शहर भाग जनसेवक किरण पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
मदतीतून समाधान
ज्येष्ठ उद्योजक आणि आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ ओमप्रकाशजी अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक उपक्रमांचीही जोड देण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध भागांतील एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात थोडी का होईना मदत व्हावी, त्यांचे जीवन सुकर व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंसह धान्य किटचे वितरण करण्यात आले. त्यातून या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले समाधान आमच्यासाठी महत्त्वाचे ठरले, अशी भावना अल्पा अग्रवाल यांनी व्यक्त केली.