एकल महिला सामुहिक विवाह सोहळ्यांचे राज्यस्‍तरावर व्‍हावे आयोजन

एकल महिला सामुहिक विवाह सोहळ्यांचे राज्यस्‍तरावर व्‍हावे आयोजन
Published on: 
छायाचित्रे ः H33419,20,21,22,23,24,25,26,27,28,29,30,31,32,33 समवेत बातमीस जोडलेले छायाचित्र. नाशिक : ताटकळत बसलेल्‍या वऱ्हाडींपैकी काही महिलांकडून अशा प्रकारे डब्‍याचा आधार घेत पोटाची भूक भागविण्यात आली. एकल महिला सामूहिक विवाह सोहळ्यांचे राज्यस्‍तरावर व्‍हावे आयोजन मान्‍यवरांच्‍या अपेक्षा ः पाच जोडप्‍यांचा थाटात विवाह सोहळा; मंत्री, अधिकाऱ्यांनी धरला ठेका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : वैयक्‍तिक पातळीवर एकल महिलांचे पुनर्विवाह होत असले, तरी याचे प्रमाण अत्‍यल्‍प आहे. एकल महिलांना त्‍यांचे हक्‍क मिळवून देताना, समाजासोबत शासन, प्रशासनाने पुढे आले पाहिजे. एकल महिलांच्‍या सामूहिक विवाह सोहळ्याचे राज्‍यस्‍तरावर आयोजन करताना नाशिकचा उपक्रम राज्‍यस्‍तरावर पोहोचविण्याची गरज मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केली. नाशिक जिल्‍हा परिषद आयोजित नवचेतना अभियानांतर्गत एकल महिलांचा सामूहिक विवाह सोहळा शनिवारी (ता. २४) त्र्यंबक रोडवरील जिल्‍हा परिषद इमारतीच्‍या आवारात पार पडला. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्‍कर भगरे, आमदार किशोर दराडे, हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, हेरंब कुलकर्णी आदी उपस्‍थित होते. मंत्री भुसे म्‍हणाले, की नाशिक जिल्‍हा परिषदेने आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. एकल महिलांच्‍या अपत्‍यांच्‍या शिक्षणाची जबाबदारीही जिल्‍हा परिषदेने पार पाडली. पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्‍व करणारा हा कार्यक्रम आहे. राज्‍यस्‍तरावर उपक्रमाची व्‍याप्ती वाढविण्याचा प्रयत्‍न असेल. मंत्री झिरवाळ म्‍हणाले, की एरवी पुनर्विवाह होत असतात; परंतु शासनाच्‍या पाठिंब्‍याने व शासकीय कार्यालयात प्रथमच एकल महिलांचा सामूहिक विवाह सोहळा होत आहे. ग्रामीण भागात एकल महिलांना आजही सन्‍मानपूर्वक वागणूक मिळत नाही. ही परिस्‍थिती बदलण्यासाठी अशा उपक्रमांची मदत होणार आहे. श्री. कुलकर्णी म्‍हणाले, की आमच्‍या संस्‍थेतर्फे राज्‍यभरातील १२० तालुक्‍यांत सामाजिक कार्य सुरू आहे. गेल्‍या काही कालावधीत भारतात पुनर्विवाहाची चळवळ खंडित झाली. अशा उपक्रमातून ही चळवळ सक्रिय करण्यात यश येईल. सामाजिक कार्यात प्रशासन पाठीशी उभे राहणे सकारात्‍मक बाब असल्‍याचेही सांगितले. जिल्‍हाधिकारी प्रसाद यांनीही शुभेच्‍छा दिल्‍या. जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवार प्रास्‍ताविकात म्‍हणाले, की यापूर्वी कार्यालयातर्फे एकल महिलांचा वधू-वर परिचय मेळावा घेतला. यापुढे पाऊल टाकताना एकल महिलांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. यापुढेही उपक्रम सुरू ठेवला जाईल. इन्‍फोः मंत्री, अधिकाऱ्यांच्या हाती अंतरपाट विधीदरम्‍यान उपस्‍थित मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी अंतरपाट धरला. विवाह सोहळा झाल्‍यावर संबळच्‍या तालावर ठेका धरत नृत्‍य करताना परंपरा जपत सर्वांचे लक्ष वेधले. विधीवत पद्धतीने विवाह सोहळा झाल्‍यावर व मंगलाष्टके झाल्‍यावर उपस्‍थितांनी अक्षतांचा वर्षाव केला. अन्‌ इतक्‍यात व्‍यासपीठावरील वराचे पादत्राणे (बूट) वधू पक्षाच्‍या मंडळींनी पळवत लग्‍न समारंभातील ही प्रथा जपल्‍याचा मिश्‍कील किस्साही समारंभात घडला. इन्‍फोः सोहळ्यात यांचा होता सहभाग... सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुनर्विवाह केलेल्या ग्रामीण भागातील महिलांच्या अपत्यांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या बचतपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक जोडप्याला ३१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. नवचेतना अभियानांतर्गत कल्याणी पगार यांचा विवाह योगेश बापू आहेर (रा. बगडू, ता. कळवण) यांच्‍याशी झाला. विजया देवरे यांचा शशिकांत देवरे (ता. बागलाण) यांच्‍याशी, सुरेखा बोरस्ते यांचा सुदाम लोहकर (रा. तळेगाव, ता. दिंडोरी) यांच्‍याशी, अनुप्रिता बोराळे यांचा मयूर जोशी (रा. नानेगाव, नाशिक) यांच्‍याशी, तर ज्योती बागूल यांचा विवाह राम कांबळे (रा. पाथर्डी, नाशिक शहर) यांच्‍याशी झाला. इन्‍फोः पुढाऱ्यांमुळे मुहूर्त लांबला समारंभाच्‍या कार्यक्रम पत्रिकेनुसार सकाळी सव्वाअकराला सोहळ्यास प्रारंभ होणे अपेक्षित होते; परंतु प्रत्‍यक्षात दुपारी एक वाजून १८ मिनिटांनी कार्यक्रम सुरू झाला. यादरम्‍यान पुढाऱ्यांची वाट पाहत, दोन तास वऱ्हाडी मंडळी मंडपात ताटकळत बसली होती. वऱ्हाडी मंडळीत काही शासकीय कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. समारंभास विलंब होत असल्‍याने भुकेने व्‍याकूळ झालेल्‍या काही महिलांनी घरून आणलेले डबे खात पोटाला आधार दिला. समारंभानंतर मसालेभाताचे पार्सलही कमी पडल्‍याने काही वऱ्हाड्यांनी नाराजी व्‍यक्‍त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com