जिल्हा परिषदेत उद्या एकल महिला सामुदायिक विवाह
मंत्री, आमदार, खासदारांसह अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पडणार ‘अक्षदा’
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवचेतना अभियानांतर्गत शनिवारी (ता. २४) सकाळी अकराला जिल्हा परिषदेत एकल महिला सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सुहास कांदे (राज्यमंत्री दर्जा) यांसह खासदार व आमदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांची माहिती संकलित करून त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या उपक्रमाचा संवेदनशील भाग म्हणजे एकल महिलांचा पुनर्विवाह, त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेने स्वीकारली आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात विवाह एकाच वेळी लावण्याचे नियोजन आहे. यात ऐनवेळी वाढही होऊ शकते. जिल्हा परिषदेने आजपर्यंत भरविलेल्या मेळाव्यांमधील हा सर्वांत मोठा मेळावा ठरणार आहे. मंत्री, आमदार व खासदारांसह अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित होणारा हा सोहळा आगळावेगळा ठरणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली.