पान ३, सर्व आवृत्ती
लोगो ः
घटनाचक्र
---------------
सरावात पास, आता परीक्षेत लागणार कस!
---------------
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. यानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्वरसह महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला आणि अर्थकारणाला चालना मिळणार आहे, हे लक्षात घेऊन सरकार, प्रशासन आणि नागरिक यांच्या सक्रियतेचा मेळ घालत हा सोहळा यशस्वी केला पाहिजे.
- अभय सुपेकर
.......................
सा धारण आठवडाभरापूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दिमाखदारपणे ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधींसह तेराही आखाड्यांच्या साधू, महंतांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा अभूतपूर्व ठरला. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर पालिका, तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले, असेच म्हणावे लागेल. ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. सुमारे २२ महिने चालणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने राज्य आणि केंद्र सरकार यांच्या निधीतून, तसेच महापालिकेच्या सहभागातून खूप मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत.
द्वारका अंडरपास, नाशिकमधील ३० वर रस्त्यांसह शहराभोवतीचा रिंगरोड, तसेच आसपासच्या परिसराला जोडणारे रस्ते, पाणी योजना, सांडपाणी प्रक्रियेसाठी ‘एसटीपी’ प्रकल्प, साधू-महंतांच्या निवासासाठी साधुग्राम यांसह कायदा व सुव्यवस्था राखणे आणि निगराणीसाठी सीसीटीव्हींचे जाळे, गर्दी व्यवस्थापनासह इतर कामकाजासाठी पोलिस दलाचे आधुनिकीकरण, गतिमान दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते, स्थानके अशा कितीतरी पातळ्यांवर तयारी सुरू आहे. ही सर्व कामे प्रगतिपथावर असताना ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यामुळे प्रशासनाची आणि महापालिकेची तारांबळ उडाली. अर्धवट कामे मान्यवरांच्या दृष्टोपत्तीस पडू नये म्हणून सुशोभीकरणाची मात्रा, रस्त्यांना मलमपट्टी असे तात्पुरते उपाय करावे लागले. त्याबाबत व्यवस्थेला आणि प्रशासनाला दोष देणेही अयोग्यच आहे. कारण, ही कामे मार्च-एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण होतील, असेच नियोजन आहे.
१६-१
रंगीत तालमीत प्रशासन पास
नाशिक शहरासह परिसरातील या कामांना सुरुवात करण्यास तुलनेने उशीरच झाला. त्यातच मध्यंतरी झालेल्या पावसाने ती काहीशी रखडली; तर त्यामुळे रस्त्यांची पार वाट लागल्याने अनेकांना जीव गमवावा लागला, काही जायबंदीही झाले. आजही परिस्थिती फारशी सुधारलेली आहे, असे नाही. तथापि, त्यांची तीव्रता काहीअंशी कमी झाली आहे, हे मात्र खरंच. ध्वजारोहणाच्या यशस्वी आयोजनाने प्रशासनाची आणि पोलिस यंत्रणेच्या सज्जतेची रंगीत तालीम पार पडली. या निमित्ताने व्यवस्थेतील काही कमतरता, व्यवस्थात्मक आणि समन्वयाच्या पातळीवरील त्रुटी, त्यातील गतिमानतेत अपेक्षित सुधारणा यावर अधिक व्यापक मंथन, सुधारणात्मक पावले उचलण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.
१६-१
सोहळ्यापासून स्थानिक दूर राहू नये
अनेक बारीकसारीक बाबी समोर आलेल्या आहेत, की त्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा सोहळा प्रत्यक्षात पार पाडत असताना कार्यवाहीत आणण्याची गरज आहे. यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, एकूण सोहळा, उपक्रमात आणि कार्यक्रमात स्थानिक नागरिकांचा सहभाग, तोही अधिक सक्रिय राहणे. ध्वजारोहणानिमित्त झालेली ग्रामफेरी असो किंवा प्रत्यक्षात सोहळा, या वेळी विशिष्ट पंथाचेच घटक दिसत होते. त्यात नाशिककरांना शोधावे लागत होते. त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षितता आणि जागेची कमतरता या कारणामुळे त्र्यंबकवासीय अल्पसंख्येने सोहळ्याचे साक्षीदार झाले. सायंकाळी आरतीला काही निमंत्रितांना सामील करून घेण्याच्या अट्टाहासानेही नाशिककर दूरच राहिले. यानिमित्त २०१५ मधील पहिल्या शाहीस्नानाची आठवण हटकून होते. बंदोबस्ताच्या अतिरेकाने भाविक आणि श्रद्धाळू या सोहळ्यापासून दूरच राहिले. राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेच्या कारणाने या वेळीही काहीसे तसे घडले. आरतीच्या समारंभानंतर नागरिकांची मोठी गर्दी गोदापात्राकडे जात असताना काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दिवसभराच्या बंदोबस्ताच्या धाकाने आणि कडेकोटपणाने पंचवटीतील नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागले.
१६-१
पोलिसांचे अनुकरणीय पाऊल
एक मात्र खरे, की या घटनेनंतर नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनीच पुढाकार घेऊन या ध्वजारोहणातून काय धडा घेता येईल, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी पोलिस यंत्रणेच्या कामकाजात काय सुधारणा करता येतील, पोलिसांनी आणि त्यांच्या नेतृत्वाने आपापल्या कार्यपद्धतीत काय बदल घडवावेत, या दृष्टीने मूल्यमापन आणि मंथनाचा व्यापक उपक्रम राबविला. त्यात विविध खाती, संबंधित यंत्रणांना एका व्यासपीठावर बोलावून त्यांच्या सूचना ऐकून सुधारणात्मक पावले उचलण्याचा निर्धार केला गेला. पोलिस यंत्रणेच्या आत्मपरीक्षणाचा हा उपक्रम इतरांनाही त्यांच्या-त्यांच्या पातळीवर अनुकरणीय असा म्हणावा लागेल. त्यासाठी त्या संबंधित विभागांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीवेळी काय सुधारणा करता येतील, या दृष्टीने चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे.
१६-१
सुधारणांना वाव, अग्रक्रम हवा
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशासह जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक, श्रद्धाळू येणार आहेत. त्यांना अत्यंत दर्जेदार सेवा, सहकार्य, मार्गदर्शन, त्यांचे येथील वास्तव्य आणि प्रवास सुखकारक होणे, या काळात कायदा व सुव्यवस्था गुणवत्तापूर्ण राखणे म्हणजेच हा सोहळा यशस्वी होणे आहे. त्यामुळेच ध्वजारोहणावेळी जे काही घडले आणि कामकाजाचे मूल्यमापन करून त्यानुसार व्यवस्थात्मक सुधारणांना अग्रक्रम देणे हेच महत्त्वाचे असेल. प्रयागराजमध्ये झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. नाशिकमध्येही २००३ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत २७ जणांना जीव गमवावा लागला होता. या वेळी भाविक, श्रद्धाळूंची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच येथील मेळा पावसाळ्यात होणे, रामतीर्थाकडे सगळीकडून येणारे रस्ते अरुंद, उताराचे आणि दुतर्फा असलेल्या इमारती यामुळे गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन गरजेचे आहे. तेथे पोलिसांच्या कौशल्यांचा कस लागेल, हे लक्षात घेऊन यंत्रणांना सुसज्जता करावी लागेल.
१६-१
कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण व्हावीत
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, उपरोल्लेखित कामांसह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने हाती घेतलेली कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने वेळेत पूर्ण करणे हे मोठे आव्हान आहे. प्रशासनातील काही अधिकारी ही कामे शाश्वत स्वरूपाची आहेत, ती वेळेत नाही पूर्ण झाली तरी नंतरही ती नाशिककरांना उपयुक्त ठरतील, असा दावा करीत आहेत. त्याबाबत दुमत नाही. तथापि, ती वेळेत पूर्ण होणे हे शहराच्या आणि सिंहस्थानिमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी अधिक श्रेयस्कर ठरणार आहे, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. उरला प्रश्न नाशिककर आणि त्र्यंबकवासीयांच्या सहकार्याचा आणि सहभागाचा! तर या दोन्हीही शहरांतील नागरिकांनी सातत्याने प्रशासन आणि सरकारला सहकार्य केले आहे. शाश्वत कामांनी शहराचा कायापालट होईल; तर त्यासाठी किंमतही मोजू, अशी भूमिका त्यांनीही घेतली. मात्र, त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय, प्रत्येक बाबतीत त्यांना सामील करून घेतल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाची १०० टक्के यशस्वीतता होणार नाही, हेही स्थानिक प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे.
१६-१
जबाबदारी सर्वांचीच...
आणखी एक महत्त्वाचा भाग. सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करणे ही केवळ प्रशासनाची आणि धोरणकर्त्यांची, सरकारचीच जबाबदारी या भावनेतही कोणी राहता कामा नये. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या शहरांचे नागरिक, तसेच जबाबदार पदाधिकारी अशा दोन्हीही भावनेतून प्रत्येकाला आपापली जबाबदारी पार पाडावी लागेल. देशाच्या आणि जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर नाशिक, त्र्यंबकेश्वरसह भारताला नेत असताना प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव ठेवत आपापल्या भूमिका परिणाकारकरीत्या पार पाडाव्या लागतील. ध्वजारोहणानिमित्त हा निर्धार दीपावलीच्या शुभपर्वावर करावा, हेच महत्त्वाचे!
-------------