सिंहस्थातून नाशिकचा चेहरामोहरा बदलेल
मुख्यमंत्री फडणवीस ः सिंहस्थ भव्यदिव्य अन अविस्मरणीय होणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३१ : सिंहस्थ कुंभमेळा हा सनातन संस्कृतीचे अभिव्यक्त रुप असून तो समरसतेचा पाया आहे. गोदावरीच्या तटावर भरलेल्या या सिंहस्थाच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकासकामे प्रगतिपथावर आहेत. या विकासकामातून नाशिक जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
गोदाघाटावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या गोदावरी महाआरतीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, सनातन संस्कृती ही शाश्वत असून ती ना आदी आहे, ना तिला अंत आहे. सनातन संस्कृतीमध्ये विविध जाती- पंथ, परंपरा व संप्रदाय सामावले आहे. या संस्कृतीत महासागराप्रमाणे त्यांचा संगम होतो. या संस्कृतींचे प्रतीक सिंहस्थ कुंभमेळा आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थ भव्यदिव्य आणि अविस्मरणीय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा ध्वजपर्वाच्या निमित्ताने जिल्ह्यातील साडेसहा हजार आदिवासी बांधवांनी एकत्रित येत गोदावरी नदीची आरती केले. हाच सनातन संस्कृतीचा खरा आत्मा आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. सिंहस्थात गंगा-गोदावरीच्या तीरावर साधु-संत व महंत तसेच भाविक एकत्रित येत श्रद्धा तसेच संस्कृतीचे प्रतीक घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरु असलेली विकासकामेही पुढील २५ वर्षांचा विचार करून हाती घेण्यात आली आहेत, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
---
२०-२
साधू- महंतांचा आर्शिवाद पाठीशी
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण पर्व आणि गोदावरी महाआरतीच्या निमित्ताने तेराही आखाड्यांचे साधू- महंत एकाच व्यासपीठावर उपस्थित असून ही अभिमानाची बाब आहे. या साधू- महंतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. सिंंहस्थ कुंभमेळा नियोजनाचे आम्ही केवळ सेवक असून खरे मालक तुम्ही आहात, असे मुख्यमंत्री यांनी साधू- महंतांना सांगितले. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या नाशिककरांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
----------------