सिंहस्थाची माहिती डिजीटल व्यासपीठावर

सिंहस्थाची माहिती डिजीटल व्यासपीठावर
Published on: 
सिंहस्थाची माहिती डिजिटल व्यासपीठावर ध्वजारोहण सोहळ्यात कुंभ संकेतस्थळाचे अनावरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना अधिकृत आणि विश्‍वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने पावले उचलली आहेत. प्राधिकरणातर्फे संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यात या संकेतस्थळाचे अनावरण होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची अधिकृत तसेच मूलभूत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणातर्फे संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर अद्ययावत माहिती, विविध डिजिटल सुविधा आणि संबंधित यंत्रणांच्या प्रणालींशी समन्वय साधणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कुंभमेळ्याचा इतिहास, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा, महत्त्वाची मंदिरे, नदी घाट, आखाडे आणि धार्मिक स्थळांची माहितीचा संकेतस्थळात समावेश असेल. पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, सूचना आणि भाविकांसाठी आवश्यक मार्गदर्शनही या माध्यमातून केले जाईल. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे, रस्ते व स्थानिक वाहतुकीसंबंधी माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन आहे. वाहनतळ, वाहतुकीतील बदल, प्रवेश व निर्गमन मार्ग, शटल सेवा, पायी जाण्याचे मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक पर्यायांची माहितीही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. मूलभूत सुविधांची माहिती भाविकांना आवश्यक सुविधा शोधणे सोपे करण्यासाठी संकेतस्थळावर विविध सेवांची स्वतंत्र निर्देशिका प्रस्तावित आहे. त्यात स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्नान सुविधा, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, पोलिस चौक्या, मदत कक्ष, हरवले-सापडले केंद्रे, निवास व्यवस्था, अन्नसेवा, वाहनतळ, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांची माहिती समाविष्ट असेल. दरम्यान, भाविकांना वेळेवर आणि अधिकृत माहिती मिळावी, यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र सुरक्षा व आपत्कालीन मदत विभाग प्रस्तावित आहे. मोबाईलवरही सहज उपलब्ध देशभरातून येणाऱ्या भाविकांचा विचार करून संकेतस्थळ बहुभाषिक स्वरूपात विकसित करण्याचे नियोजन आहे. संगणक आणि मोबाईलवर सहज वापरता येण्यासह कमी इंटरनेट वेगातही ते कार्यक्षम राहण्यावर भर देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींसह विविध गरजा असलेल्या वापरकर्त्यांना माहिती देण्यासंदर्भातील सुविधांचाही विचार करण्यात आला आहे. निवडक घाट, मंदिरे व सार्वजनिक ठिकाणांची आभासी सफर, ३६० अंश दृश्ये, ध्वनी मार्गदर्शन, व्हिडिओ आणि अधिकृत थेट प्रक्षेपणाच्या लिंक देण्याचा प्रस्तावित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com