23362
सिन्नर : उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर बंद केल्याबाबत जाब विचारताना नगर परिषदेचे पदाधिकारी.
उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेवा अचानक बंद
सिन्नरला नगरसेवकांनी जाब विचारताच दोन तासात पुन्हा सुरु
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २ : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवारी (ता. २) अचानक बंद करण्यात आली. या प्रकारामुळे रुग्णांचे हाल झाल्याने त्यांनी तातडीने नगरसेवकांकडे धाव घेत संताप व्यक्त केला. याची गंभीर दखल घेत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने तातडीने उपजिल्हा रुग्णालय गाठून प्रशासनाला जाब विचारला. या तीव्र पाठपुराव्यानंतर अवघ्या दोन तासांत डायलिसिस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर अचानक बंद झाल्याचे समजताच नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधत पूर्वसूचनेशिवाय सेवा बंद केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकारची माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांना देण्यात आली. आमदार कोकाटे यांनी तातडीने जिल्हा शल्यचिकित्सकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत डायलिसिस सेंटरचे कामकाज तत्काळ सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे कडक निर्देश दिले. त्यानंतर प्रशासनाची जुळवाजुळव होऊन ही जीवनदायी सेवा पूर्ववत सुरू झाली.
नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी डायलिसिस सेंटर बंद राहिल्यामुळे गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाची व अडचणींची गंभीर दखल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. डायलिसिस सेवा ही केवळ सामान्य वैद्यकीय सुविधा नसून ती अनेक मूत्रपिंडविकार (किडनी) त्रस्त रुग्णांच्या जीवनाशी निगडित अत्यंत अत्यावश्यक आरोग्यसेवा आहे.त्यामुळे तांत्रिक, प्रशासकीय वा मनुष्यबळाच्या कारणास्तव ही सेवा कधीही विस्कळीत होऊ नये, असे स्पष्ट करत आरोग्य प्रशासनाने यापुढे अधिक सतर्क राहण्याची तकादी लावली.
या वेळी हर्षद देशमुख, सागर भाटजिरे, मनोज देशमुख, उदय गोळेसर, पंकज मोरे, पंकज जाधव, लता हांडे, बाळासाहेब उगले, अजय गोजरे, शुभम वारुंगसे, अमोल झगडे, ज्योती मोरे, सविता खोळंबे आदींसह नगरपरिषद पदाधिकारी व नगरसेवक संख्येने उपस्थित होते.