पान-३ मुख्य अंक
-----------------------
सिन्नरमध्ये आठ जणांवर सावकारीचा गुन्हा
--------------
सात जणांना अटक ः पत्नीच्या फिर्यादीनंतर गुन्हा, एका महिलेचा शोध सुरू
----------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१४ ः येथील रामनगरीतील अतुल रामदास बोऱ्हाडे यांनी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांची पत्नी प्रियांका अतुल बोऱ्हाडे यांनी दिल्याने पोलिसांनी आठ जणांविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन संभाजी गिते, नलिनी सचिन गिते, हर्षल गोळेसर, सचिन धनगर, सौरभ खेडलेकर, मीरा खोपे, उज्वला लोखंडे, माधुरी सागर शिंदे (सर्व रा. सिन्नर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत सात जणांना अटक करण्यात आली आहे. नलिनी गिते या फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
-------------
अतुल बोऱ्हाडे यांनी बुधवारी (ता.११) आत्महत्या केली होती. ‘संशयितांकडून घेतलेली रक्कम वेळोवेळी परत करूनही फक्त व्याजाची रक्कम मिळाली असून मुद्दल तशीच आहे असे सांगत संशयितांनी घरी येऊन शिवीगाळ, दमदाटी केली. मानसिक त्रास दिला व त्या त्रासाला कंटाळून अतुल बोऱ्हाडे यांनी आहे. फोनवर, मेजेसद्वारेही त्रास दिला. पती अतुल यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या त्रासाला कंटाळूनच त्यांनी बुधवारी (ता.११) आत्महत्या केली’ असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर तपास करत आहेत. शनिवारी (ता.१४) रात्री उशिरापर्यंत नलिनी गिते वगळता उर्वरित सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते. नलिनी गिते यांचाही पोलिस शोध घेत होते. सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहरात अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. येथील व्यावसायिकांना अर्थपुरवठा करून त्याच्या व्याजाचा व्यवसाय फोफावलेला आहे. या अगोदरही एका बड्या सावकारावर कारवाई झाली होती.
---------------------