महिलेवर लैंगिक अत्याचार;
संशयित खडेश्वर महाराजला अटक
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २८ : येथील दत्तवाडी आश्रमात धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेवर हत्याराचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला मुख्य संशयित उमाकांत खडेश्वर महाराज याला शहर पोलिसांनी दिंडोरी हद्दीतून चार दिवसांपूर्वी अटक केली. या वेळी पोलिसांनी संशयित महाराजकडून एक एअरगन आणि तलवार जप्त केली. संशयिताची पोलिस कोठडी संपल्यानंतर बुधवारी (ता.२८) न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.
तालुक्यातील बाभुळगाव खुर्द येथील रहिवासी असलेला आणि दत्तवाडी आश्रमात वास्तव्य करणारा खडेश्वर महाराज (वय ७० वर्ष) याने आश्रमात आलेल्या एका महिलेवर धार्मिक विधीचे आमिष दाखवून आणि हत्याराचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद पिडितेने तीन वर्षापूर्वी दिली होती. तसेच या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देऊ नये, यासाठी तिच्या वडीलांना देखील जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित खडेश्वर महाराज हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. अखेर चार दिवसापूर्वी येवला शहर पोलिसांनी त्यास दिंडोरी हद्दीतून अटक केली.
संशयित महाराज याला तीन दिवसापूर्वी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती; त्यानंतर कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी दिली.