सेकंड मेन शेजारी
वॉशिंग मशीनसह स्मार्ट उपकरणांची खरेदी
आकर्षक सवलती, इएमआय योजनांमुळे खरेदीचा उत्साह
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स वस्तूंच्या खरेदीला चालना मिळत आहे. नवीन वस्तूंची खरेदी, जुन्या उपकरणांची अदलाबदल आणि घराला आधुनिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने नागरिकांकडून टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, डिश वॉशर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर, व्हॅक्यूम क्लीनर यांसारख्या वस्तूंना पसंती दिली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध सवलती, एक्स्चेंज ऑफर्स, कॅशबॅक आणि नो-कॉस्ट इएमआयच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शॉपिंग मॉल्स, कॉलेज रोड, गंगापूर रोड, सिडको, नाशिक रोड आणि उपनगरांतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. दुकानदारांनी ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावर मनोरंजन करणारे टॉइज ठेवले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वस्तू घरी आणण्याची परंपरा असल्याने अनेक कुटुंबे खरेदीसाठी शोरूममध्ये दाखल होत आहेत. यंदाच्या खरेदीमध्ये मोठ्या स्क्रीनचे स्मार्ट टीव्ही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ४३, ५५ आणि ६५ इंच स्क्रीनच्या टीव्हीबरोबर फोर-के डिस्प्ले, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि उत्कृष्ट साउंड क्वालिटी असलेल्या मॉडेल्सची ग्राहकांकडून चौकशी होत आहे. मनोरंजनाच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेता ग्राहक आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपकरणांकडे वळत आहेत. ऊर्जा बचत करणारे इन्व्हर्टर फ्रिज, मोठ्या क्षमतेचे डबल डोअर फ्रिज, फ्रॉस्ट फ्री मॉडेल्स तसेच फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनला ग्राहक पसंती देत आहेत. जुन्या उपकरणांच्या बदल्यात नवीन वस्तू घेण्यासाठी एक्स्चेंज ऑफर्सचा लाभ घेतला जात आहे.
---चौकट
व्यवसायाला नवी ऊर्जा
पारंपरिक उपकरणांबरोबर एअर फ्रायर, रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर, वॉटर प्युरिफायर आणि स्मार्ट होम उपकरणांविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसत आहे. कमी वेळेत घरातील कामे पूर्ण करण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर वाढत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांना मिळालेला दिवाळी बोनस, वेतन आणि सणासुदीच्या सवलतींमुळे बाजारपेठेतील खरेदीला हातभार लागत आहे. ग्राहकांकडून प्रत्यक्ष शोरूममध्ये वस्तू पाहून, त्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना करून खरेदी करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचेही बाजारपेठेत चित्र आहे. दिवाळीच्या प्रकाशपर्वात शहराच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून, सणासुदीच्या खरेदीमुळे व्यवसायाला नवी ऊर्जा मिळाली आहे.