धुळे : टुडे १ साठी...
---
लोगो छायाचित्र ः 35103
---
सौरऊर्जेमुळे धुळे- नंदुरबार वीजनिर्माता
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून ३५ हजार घरांवर प्रकल्प कार्यान्वित
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : वाढत्या वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील घरगुती ग्राहक मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेकडे वळले आहेत. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील ३५ हजार १२० घरांच्या छतांवर १२७.५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संच कार्यान्वित झाले आहेत. यामुळे सामान्य वीजग्राहक केवळ वीज वापरणारे न राहता स्वतः वीजनिर्माते बनले आहेत.
वीज महावितरण कंपनीच्या जळगाव परिमंडलात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, परिमंडलातील एकूण ९६ हजार ६५५ घरांवर ३५७.९७ मेगावॉटचे प्रकल्प उभारले गेले आहेत. यात धुळे जिल्ह्यातील २४ हजार २६७ ग्राहकांनी ८८.२७ मेगावॉट, तर नंदुरबार जिल्ह्यातील १० हजार ८५३ ग्राहकांनी ३९.२३ मेगावॉट क्षमतेचे सौरसंच बसवले आहेत. पूर्वी अडगळीचे साहित्य किंवा पाण्याच्या टाक्या ठेवण्यासाठी वापरली जाणारी घरांची छते आता वीजनिर्मितीची केंद्रे बनली आहेत. स्वतंत्र जागेची गरज नसल्याने शहरी व ग्रामीण भागात या योजनेला मोठी पसंती मिळत आहे.
शासनाकडून अनुदान
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून एक किलवॉटसाठी ३० हजार, दोन किलोवॉटसाठी ६० हजार आणि तीन किलोवॉट व त्यापुढील क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान दिले जाते. तसेच गृहनिर्माण संस्था व इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठीही अनुदान उपलब्ध आहे. बँकांकडून सवलतीच्या दरात सुलभ कर्ज आणि ग्रामीण भागात योजनेचा प्रसार करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधी दिला जात आहे. एक ते तीन किलोवॉटच्या प्रणालीतून दरमहा १२० ते ३६० युनिट मोफत वीज मिळत असून, शिल्लक राहिलेली वीज महावितरणकडे जमा होऊन तिची रक्कम वीजबिलात समायोजित केली जाते.
---
कोट
मासिक ३०० युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी ही योजना उपयुक्त आहे. सुमारे २५ वर्षे या प्रकल्पातून मोफत वीज मिळणार असून, वीजबिल जवळपास शून्य करणे शक्य असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- आय. ए. मुलाणी,
मुख्य अभियंता, महावितरण कंपनी, जळगाव परिमंडल