पान- २
YEO26B27155 YEO26B27156
सोमठाण जोश : येथे अपघातग्रस्त झालेली लक्झरी बस व कंटेनर.
-------------------
कंटेनर-लक्झरी बसची धडक, चालक ठार
११ प्रवासी जखमी ः सोमठाण जोश घाटातील अपघात
------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१३ : येवला- नांदगाव रस्त्यावरील सोमठाण जोश घाटात कंटेनर व खासगी लक्झरी बसची मंगळवारी (ता.१३) सकाळी भीषण धडक होऊन बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून अकरा प्रवासी जखमी झाले आहेत.
हा अपघात सकाळी सातच्या सुमारास झाला. यात बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात इतका भयानक होता, की अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. नांदगावकडून येवल्याच्या दिशेने येणारी खासगी लक्झरी बस (एमपी ४४, झेडडी ५३४१) घाटातून जात असताना येवल्याहून नांदगावकडे जाणारा कंटेनर (एमएच ४३, सीके ०७५१) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
या धडकेत बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. चालकाच्या आसनाजवळील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, बस कंटेनरला अडकलेली होती. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
काही वेळातच रुग्णवाहिका आल्याने जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. बसचालक राम विलास (३४, राजस्थान) जागेवर ठार झाला. मोहम्मद फयाज चौहान (३०), मोहम्मद समीर (३२), रवींद्र चौधरी (४६), जितू राठोड (२८), सोनिका कुमावत (१४), रुपमा कुमावत (४०), सुमन कुमावत (३०), जितेंद्रसिंग जीवनसिंग (३५), बबलू कुमावत (३५), त्रिशा कुमावत (७) आणि नीरज कुमावत (९) हे ११ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे सोमठाण जोश घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. येवला तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.
---------------------