Latest Crime News | साडेदहा लाखांचे दागिने चोरणारा जावई गजाआड; चावी चोरून केली घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold ornaments and suspected son-in-law seized in case of burglary in Dhruvnagar area. Gangapur Senior Police Inspector Riyaz Shaikh and team

साडेदहा लाखांचे दागिने चोरणारा जावई गजाआड; चावी चोरून केली घरफोडी

नाशिक : गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये बंद घराची चावी वापरून घरातील साडेदहा लाखांचा दागिने चोरी प्रकरणी गंगापूर पोलिसांनी एकाला अटक केली. तपासात संशयित हा चोरीची फिर्याद देणाऱ्या महिलेचा जावई असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल होऊन २४ तासात या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली. विशेषत: सीसीटीव्हीतील फुटेजमुळे संशयित बेरोजगार जावायाला पोलिसांनी गजाआड केले. (son in law arrested for burglary ten half lakh worth of jewellery Nashik Latest Crime News)

आलोक दत्तात्रय सानप ( २३, रा. गुलमोहर अपार्टमेंट, मखमलाबाद रोड, पंचवटी) असे संशयित जावयाचे नाव आहे. मीरा शशिकांत गंभीरे (रा. बालाजी पॅराडाईज, ध्रुवनगर, गंगापूर शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता.२४) भरदिवसा त्यांच्या बंद घराचा दरवाजा अज्ञात संशयिताने चावीच्या सहाय्याने उघडला आणि घरातून १० लाख ४७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला. यामध्ये तक्रारदार गंभीरे यांचा जावयाप्रमाणेच दिसणारा संशयित व्यक्ती दिसून आल्याने पोलिसांनी संशयित आलोक सानप यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर संशयित सानप याने गुन्ह्याच कबुली दिली.

त्यानेच सासू गंभीरे यांच्या घराची चावी चोरून दागिने चोरले होते. संशयित सानप याच्याकडून ९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचे २४९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहे. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, उपनिरीक्षक संजय भिसे, हवालदार सचिन सुपले, भारत बोळे, गिरीष महाले, समाधान शिंदे, योगेश चव्हाण, सोनू खाडे यांनी सदरची कामगिरी बजावली.

हेही वाचा: Fire Accident : 3 मजली आंबेकर वाड्यास आग; लाखोचे नुकसान

संशयित जावई बेरोजगार

फिर्यादी मीरा गंभीरे यांचे ब्लुटी पार्लर असून, त्यांच्या मुलीचा संशयित सानप याच्याशी प्रेमविवाह झाला आहे. सानप याने महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले असून, सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे त्याचे नेहमीच सासुरवाडीला जाणे असल्याने याच दरम्यान त्याने घराच्या मुख्य दरवाजाची दुसरी चावी चोरली होती. गंभीरे यांच्या फिर्यादीनुसार, १० लाख ४७ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.

यात २ लाख ४३ हजार ६०० रुपयांचे मंगळसूत्र, १ लाख ३४ हजार ४०० रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र, ९६ हजार ६०० रुपयांचे मंगळसूत्र, एक लाख २८ हजार १०० रुपयाची अंगठी, ८४ हजार रुपयाची चेन, २ लाख ९४ हजारांच्या बांगड्या, २१ हजारांचे कानातील जोड, ३३ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे कानातील जोड, ८ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे कानाचे जोड, ४ हजार २०० रुपयांचे नथ असे दागिने चोरीला गेले होते.

हेही वाचा: 5 वर्षानंतर प्रथेनूसार गडावर होणार बोकड बळी विधी; न्यायालयाने बंदी उठवली