SGR26B07634
सोनगीर : सोनगीरच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार व सहकारी अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी.
----------
सोनगीरची माहिती एका क्लीकवर!
ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. ७ : येथील ग्रामपंचायत व शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसह गावाची परिपूर्ण माहिती देणारे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) ग्रामपंचायतीने बनवले असून, कार्यालयात न जाता घरबसल्या तक्रारी करता येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जगदीश गिंदोडिया, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त संजय सैंदाणे, ग्रामपंचायत प्रशासक एच. डी. महंत, माजी सरपंच लखन ठेलारी, ग्रामपंचायत अधिकारी मेघश्याम बोरसे आदी उपस्थित होते. डिजिटल युगाशी पाऊल मिळवत ग्रामपंचायतीने वेबसाईट तयार केली असून, तिचे डिझाईन करणाऱ्या तंत्रज्ञांनी स्क्रीनवर या वेबसाईटची वैशिष्ट्ये आणि ती कशी वापरावी, याबद्दल सविस्तर माहिती दिली. या वेबसाईटच्या माध्यमातून संस्थेचे कार्य, आगामी प्रकल्प, आणि विविध सेवांची माहिती आता एका क्लिकवर जगभरातील लोकांपर्यंत पोहोचणार आहे. युजर्सना हाताळण्यास अत्यंत सोपी आणि आकर्षक, अशी ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये सोनगीर गावाची परिपूर्ण माहिती, लोकसंख्या, गावातील सण, विविध मंदिरे, वैशिष्ट्ये, सुवर्णगिरी किल्ला, नदी, धरणे, शेती, शासन, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या विविध योजना, लोकसंख्या, मजूर संख्या, शेती, पिके, पर्जन्यमान आदी संपूर्ण माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीत आतापर्यंत झालेले सरपंच मावळते सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे फोटो आहेत. संकेतस्थळामुळे सोनगीरची माहिती जगभर पोहचणार आहे.