SGR26B07580
धुळे : कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देताना डोंगरगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील.
-------
सोनगीर- वालखेडा
रस्त्याची दुरवस्था
सोनगीर, ता. १५ : सोनगीर ते वालखेडा या सुमारे दहा किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, या मार्गावरून दुचाकीसह अन्य वाहन चालवणे धोक्याचे व कसरतीचे ठरत आहे. याप्रकरणी डोंगरगावचे (ता. शिंदखेडा) माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.
सोनगीर ते अमळनेर हा ३५ किलोमीटरचा मार्ग वालखेडाहून जातो. धुळे ते जळगाव जिल्हा जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने वाहतूक जास्त आहे. या मार्गावर शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी (खुर्द व बुद्रुक), वालखेडा, डोंगरगाव, कंचनपुर, वाघोदे, तर अमळनेर तालुक्यातील मांडळ, वावडे, तरवाडे, शिरसाळे व झाडी, दुसऱ्या मार्गाने मुडी, गलवाडे, झाडी, अमळनेर असा मार्ग आहे. ग्रामीण जनतेला धुळे अथवा अमळनेर जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल व वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. रस्त्याची त्वरित दुरूस्ती व्हावी, अशी मागणी माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी निवेदनात केली आहे.