बसस्थानक मंजूरीबाबत प्रशासनाचा खो वर खो

बसस्थानक मंजूरीबाबत प्रशासनाचा खो वर खो
Published on: 
बसस्थानक मंजुरीबाबत प्रशासनाचा खो-खो सोनगीर, ता. १९ ः येथे चार वेगवेगळ्या बसथांबाऐवजी सर्व सोयींनीयुक्त बसस्थानक व्हावे, या ग्रामस्थांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अद्यापही प्रशासन खो वर खो देत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने बसस्थानकासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतीकडून विनामूल्य जागा मागितली आहे. मात्र ती न देता येथील मंडळ अधिकाऱ्यांनी परिवहन महामंडळांकडून वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे. कागदपत्रांची पूर्तता करतानाच वेळेचा अपव्यय होत असून, खो वर खो दिला जात आहे. जुलै २०२६ मध्ये राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सोनगीर ग्रामपंचायतीने बसस्थानकासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. त्याला दोन महिन्यांनंतर मंडळ अधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून विविध कागदपत्रे मागवली आहेत. त्यात गट क्रमांक ६४ मधील प्रस्तावित जागेचा अद्ययावत सातबारा व आठ-अ उतारा, जागेचा गाव नकाशा, मोजणी व चतुःसीमा दर्शविणारा नकाशा, बसस्थानकासाठी जागेचे क्षेत्रफळ व सविस्तर तपशील, १९५० पासून ते आजपर्यंतचा फेरफार व मालकी हक्क कागदपत्रे, ग्रामपंचायतीचा जागेबाबत ना हरकत दाखला व ठराव, जागा, आरक्षित असल्यास आरक्षणाची प्रत व मंजूर आराखडा, बसस्थानक उभारणीबाबत महामंडळाची प्रशासकीय मान्यता, मंजूर आराखडा व अंदाजपत्रक, निधीची तरतूद व माहिती, विनामूल्य हस्तांतरित करण्याबाबत महामंडळाचा अधिकृत प्रस्ताव व सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता, महामंडळाचे हमीपत्र, जागेचे मूल्यांकन व बाजारमूल्याबाबतची कागदपत्रे, जागा हस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रे आदी कागदपत्रे पाठवण्याची विनंती केली आहे. १९५० पासूनची कागदपत्रे राज्यपरिवहन मंडळ कसे व कधी पाठवतात, हे सांगता येत नाही. त्यामुळे बसस्थानक प्रशासनाच्या लालफितीत अडकण्याची शक्यता तर नाही असा प्रश्न आहे. ........................... चौकट बसस्थानकाची गरज येथे धुळे, शिरपूर, नंदूरबारकडे जाण्यासाठी चार वेगवेगळे थांबे आहेत. सर्व थांब्यावर सुविधांचा अभाव आहे. प्रवाशांना ऊन, थंडी, पाऊस अंगावर घेत उभे राहावे लागते. पिण्याचे पाणी, शौचालय व स्वच्छतागृह नाही. पूर्वी शिरपूरकडे जाणाऱ्या बसथांबासाठी पिकअप शेड उभारले होते. मात्र सध्या त्याला अतिक्रमणाचा विळखा पडला असून, पंधरा वर्षापासून त्या शेडमध्ये कोणीही बसत नाही. तीन वेगवेगळ्या बसथांबामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तीनऐवजी एकाच ठिकाणी सर्व बस थांबतील, असे सुविधांयुक्त बसस्थानक व्हावे अशी मागणी आहे. मात्र शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.